आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मराठवाड्यात दोन हजार शाळा, अडीच हजार अंगणवाड्या तहानलेल्या, यंत्रणेला गांभीर्य नाही

हिंगोली | मंगेश शेवाळकर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यामध्ये जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांना नळजोडणी देण्याचे काम अपूर्ण आहे. अद्यापही २ हजार शाळांतील विद्यार्थी तसेच अडीच हजार अंगणवाड्यांमधील बालके नळजोडणीअभावी तहानलेली आहेत.

राज्यात जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरी नळजोडणी दिली जात आहे. ग्रामीण भागांमधून गावकऱ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत जोडणी दिली जात आहे. याशिवाय शाळा व अंगणवाड्यांमध्येही नळजोडणी देऊन विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मराठवाड्यामध्ये १८ हजार ५२६ शाळांपैकी १६ हजार ४९६ शाळांमध्ये नळजोडणी देण्यात आली असून अद्यापही २०३५ शाळांमध्ये नळजोडणी देणे बाकी आहे. यासोबतच मराठवाड्यातील १८ हजार ६२९ अंगणवाड्यांपैकी १६ हजार ४० अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी देण्यात आली असून २,६३२ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी देणे शिल्लक आहे. दरम्यान, जि.प. शाळा व अंगणवाड्यांमधून नळजोडणी देण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयस्तरावरून वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. मात्र प्रत्येक वेळी बैठकांमधून त्याच त्या सूचना दिल्या जात असल्याने नळजोडणीच्या कामांकडेही यंत्रणेकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी नळजोडणी देण्याची गरज; विभागीय आयुक्तालयाकडून वारंवार सूचना देऊनही यंत्रणेला गांभीर्य नाही

एक महिन्याचा कालावधी शिल्लक
आता जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमार्फत नळजोडणी देण्यात आल्यास शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडीतील बालकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. अन्यथा शाळांमधून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत असला तरी पाणी मात्र घरून आणावे लागणार असल्याचे चित्र आहे.

२०३५ शाळा नळजोडणीच्या प्रतीक्षेत
जिल्हा शाळा प्रतीक्षेतील शाळा
औरंगाबाद ३२९२ १४७
जालना २,०११ ५०३
हिंगोली १,१४० ३५
नांदेड ३,३८१ ४४४
उस्मानाबाद १,८४३ २६२
बीड ३,३४९ ४०१
लातूर २,००१ २४३

अंगणवाड्यांची स्थिती अशी
जिल्हा अंगणवाड्या प्रतीक्षा
औरंगाबाद ३,३५६ १,७२१
जालना १,९१० ४९६
उस्मानाबाद १,८९५ ४६
बीड २,८९१ ७६
लातूर २,३०७ २९३

सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणी देण्याची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...