आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कळमनुरी मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलिस जमादाराचा मृत्यू

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील बैठक आटोपून कळमनुरी येथे मिरवणुक बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलिस जमादाराच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस जमादाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता. 11 दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरेश बळीराम बांगर (57) असे जमादाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत तालुका विशेष शाखेत कार्यरत असलेले सुरेश बळीराम बांगर हे आज सकाळी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने आले होते. दुपारी बैठक आटोपून ते दुचाकी वाहनावर कळमनुरीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा शिवारात आले असतांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बांगर जागीच कोसळले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरीक तसेच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार गजानन होळकर, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बांगर यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.

दरम्यान, जमादार सुरेश बांगर हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार होते. हिंगोली जिल्हा पोलिस दलात त्यांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावले आहे. गंभीर गुुन्हयांची उकल करणे, फरारी आरोपींची माहिती काढणे, जिल्हयातील गोपनिय माहिती घेऊन आरोपींना अटक करण्यात त्यांचा हातखंडा होता. मागील काही दिवसांपासून ते कळमनुरी तालुका विशेष शाखेत कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.