आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणांना सूचना:कुरुंदा पूर परिस्थितीतून नुकसान टाळण्यासाठी 8 दिवसांत उपाय योजना करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहीत छायाचित्र - Divya Marathi
संग्रहीत छायाचित्र

वसमत तालुक्यातील कुरुंदा भागात पुर परिस्थितीने नुकसान टाळण्यासाठी आठ दिवसांत सर्व यंत्रणांनी उपाय योजनांची कामे हाती घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी (ता. ३) दिल्या आहेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता खिराडे, जलसंधारण विभागाचे अधिकारी प्रियंका राजपूत, अधिकारी ए. टी. भंगीरे, तहसीलदार अरविंद बोळंगे, नियोजन, कृषी, वन, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सर्व यंत्रणाकडून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती घेतली. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने ४ ते ५ मशीन्स उपलब्ध कराव्यात त्यानंतर तातडीने नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला तसेच सरळीकणाला सुरवात करावी. पुराचे पाणी गावात जाऊ नये यासाठी रस्त्याच्या बाजू मोठ्या करून घ्याव्यात तसेच गावातील अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायतींना तातडीने कार्यवाही करावी.

गावातील स्मशानभुमीच्या परिसरात असलेल्या नाल्यांची मोजणी करून त्या ठिकाणीच्या नाल्याचे खोलीकरण करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. मोजणीच्या कामासाठी भुमी अभिलेख कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाने तातडीने पुढाकार घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कुठल्याही परिस्थितीत पुढील आठ दिवसांत कामाला सुरवात होईल याचे नियोजन करावे. प्रत्येक विभागाने त्यांच्या आखत्यारीत येणारी कामे सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी पापळकर यांच्या सुचने नंतर आता लवकरच कामाला सुरवात होणार असून यावर्षी गावकऱ्यांच्या पुराच्या पाण्यापासून सुटका होेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.