आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत येथील पूर्णा कारखाना भागात एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाला चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. ११ दुपारी रंगेहात पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील पूर्णा कारखाना भागात छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका तक्रारदाराचा अनुकंपाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने मुख्याध्यापक भगवान नारायण लहाने यांच्याकडे वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली. मात्र स्वतः प्रस्ताव पाठवण्यासाठी मुख्याध्यापक लहाने यांनी चाळीस हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. सदर रक्कम आज दुपारी देण्याचे ठरले होते.
या संदर्भात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, विजय पवार, जमादार तानाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजेंद्र वर्णे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार, शिवाजी वाघ, राजाराम फुफाटे, शेख अकबर यांच्या पथकाने शाळेच्या परिसरात सापळा रचला.
दरम्यान दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक भगवान लहाने यांनी चाळीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.