आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथील परमहंस महंमद खान महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी (२० जून) स्वागत करण्यात आले. यानंतर दिंडीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. दरम्यान, गेल्या १५ वर्षांपासून या पालखीच्या वारीचा हा वसा सुरू आहे.
यासंदर्भात दिंडी चालक अनिल महाराज देशमुख यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथे परमहंस महंमद खान महाराज हे संत म्हणून ओळखले जातात. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या महंमद खान महाराज यांचे या ठिकाणी मंदिर आहे. काही वर्षांपूर्वीच या ठिकाणी गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. महंमद खान महाराज यांनी घोड्यावर पंढरपूर वारी केल्याची आख्यायिका आहे. या वर्षी ६ जून रोजी या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून ठिकठिकाणी हिंदू-मुस्लिम भाविक या पालखी सोहळ्याचे स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बडनेरा, वाशीम येथे पालखी सोहळ्याचे स्वागत झाले आहे. या पालखी सोहळ्यात यावर्षी १५० वारकऱ्यांचा सहभाग असून त्यामध्ये दोन मुस्लिम वारकरी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी संपूर्ण गावकरी या सोहळ्यासाठी मदत करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बहुउद्देशीय संस्थेमार्फत पालखी काढली जात असून यामध्ये रवींद्र महाराज कारनेळ, आकाश महाराज लक्षणे, वसंत महाराज इंगळे, रावसाहेब महाराज देशमुख, आशिष महाराज तसरे, कुणाल महाराज देशमुख यांच्यासह भाविकांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हिंगोली येथे या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले असून नारायण जोशी यांच्यातर्फे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी हिंगोली येेथे भोजन करून पालखी सोहळा पुढील प्रवासाला रवाना झाला आहे.
२००७ मध्ये पालखी सोहळा सुरू
अनिल महाराज २००७ मध्ये एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी परमहंस महंमद खान महाराज यांचा पालखी सोहळा काढण्याचा निर्णय ग्रामस्थांसमोर बोलून दाखवला. त्यानंतर हा सोहळा सुरू झाला. तो आजतागायत सुरूच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.