आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामांची गती लक्षात घेता ही कामे मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनेचे पाणी पुढील वर्षी मिळण्याची शक्यताही कमीत असल्याने गावकऱ्यांच्या डोक्यावरून पाण्याचा हांडा कधी उतरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कार्यालयात अभियंत्यांची 50 टक्के पदे रिक्त असल्यावर कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांचे म्हणणे आहे.
हिंगोली जिल्ह्यात 563 ग्रामपंचायती असून 707 गावे आहेत. या गावांपैकी अनेक गावांमधून नळ पाणी पुरवठा योजना नसल्यामुळे गावकऱ्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तर टंचाई उपाय योजनेमध्ये तात्पुरती नळ योजना उभारण्याचे कामही पावसाळ्याच्या तोंडावर होते. त्यामुळे तात्पुरती नळ योजनेचा गावकऱ्यांना फायदा होत नाही.
235 कामांना मान्यता
दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत मागील वर्षात हिंगोली जिल्हयासाठी 630 नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आराखडा तयार करून कामाला तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे केवळ 500 योजनांचाच आराखडा तयार झाला असून केवळ 235 कामांना मान्यता देऊन 150 कामांच्या निविदा लावण्यात आल्या आहेत. अद्यापही अर्ध्याधिक कामांना मान्यता तसेच निवीदा प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे.
चार पदे रिक्त
पाणी पुरवठा विभागाच्या या कारभारामुळे या नळ योजना दोन वर्षाच्या मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या नळ योजना मंजूर झालेल्या गावांतून गावकऱ्यांच्या डोक्यावरील हंडा पुढील दोन वर्ष कायम राहणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये अभियंत्यांची 22 पदे असून त्यापैकी 10 पदे रिक्त आहेत. तसेच उप अभियंत्यांची 5 पदे मंजूर असून चार पदे रिक्त आहेत. सहाय्यक भुवैज्ञानिक, उपकार्यकारी अभियंता ही पदे रिक्त असल्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ही पदे भरणे आवश्यक बनले आहे.
रिक्तपदांमुळे कामात अडचणी
ग्रामीण पाणी पुरवठा विभागात पंन्नास टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या खाजगी कंपनीकडून आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षात योजना पूर्ण होईल. -गौरव चक्के, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग, हिंगोली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.