आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोधकार्य सुरू:बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले; पण घरी परतलेच नाही! कालव्याचे पाणी पिताना झाला घात, हिंगोली जिल्ह्यातील घटना

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारात असलेल्या कालव्याच्या पाण्यात दोन युवक वाहून गेल्याची घटना मंगळवारी (ता. 5) दुपारी दोन वाजता घडली आहे.

कपिल बाबुराव गायकवाड व तेजस मनोज खंदारे ( रा. वाई गोरखनाथ, ता. वसमत) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील तेजस खंदारे, कपिल गायकवाड व अन्य दोघे जण तेजस खंदारे यांच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी आज रिक्षाने आसोला येथे आले होते. त्या ठिकाणी पत्रिका वाटप करून चौघेही परत गावाकडे निघाले.

मात्र आसोला शिवारातील पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कालव्यात कपिल व तेजस दोघे जण पाणी पिण्यासाठी उतरले. मात्र पाणी पीत असताना दोघांचाही पाय घसरला आणि दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले इतर दोघांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत दोघेही दिसेनासे झाले.

या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली तसेच वाई येथील गावकऱ्यांना ही माहिती मिळाली. हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, जमादार भुजंग कोकरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्याच्या पाण्यात कपिल व तेजस यांचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.

या प्रकरणात हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन कालव्याचे पाणी तात्पुरत्या स्वरूपात कमी करण्याची विनंती केली आहे. आता कालव्याचे पाणी कमी झाल्यानंतर बुधवारी ता. ६ सकाळी त्या दोघांचा पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...