आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाऱ्याचा तडाखा:कुरुंदा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसराला बुधवारी (८ जून) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चांगलाच तडाखा दिला असून वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरावरील पत्रे उडून गेल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. केळीच्या पिकाचा हाती आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावला गेल्याने केळी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

कुरुंदा व परिसरात दुपारी साडेचार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत असलेली मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विद्युत खांब पडल्याने या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत धरून घरात थांबावे लागले. तसेच अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह धान्य भिजून नुकसान झाले.

कुरुंदा परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या केळीचे घड काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या परिसरात हाती आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाले असून केळीची झाडे, घड जमिनीवर आडवे पडल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री सात वाजता पाऊस थांबल्यानंतर घरावरील उडालेली टिनपत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी धावपळ झाली. झाडे उन्मळून पडली तर घरावरील पत्रे उडाली

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...