आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान भावाने केला मोठ्याचा खून:शेतीच्या वादातून हत्या करणारा ताब्यात; हिंगोलीच्या नवलगव्हाण येथील घटना

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी ता. 11 उघडकीस आली आहे. चंद्रभान यशवंता कोरडे (45) असे मयताचे नाव असून शेतीच्या वादातून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे चंद्रभान कोरडे व त्यांचा भाऊ मारोती कोरडे यांच्यात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु होता. या वादातून त्यांच्या नेहमीच कुरबुरी होत होत्या. या शिवाय चंद्रभान हे दारुपिऊन शिवीगाळ देखील करीत होते. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मारोती कोरडे याने त्यांचा कायमचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शनिवारी ता. 10 रात्री चंद्रभान हे शेतात जागणीसाठी गेले होते. त्यानंतर आज सकाळी ते घरी परतलेच नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र नवलगव्हाण ते सांटबा मार्गावर त्यांचा मृतदेह वाटसरूंना आढळून आला. या प्रकाराची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, संजय केंद्रे, जमादार अमित जाधव, आकाश पंडीतकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी चंद्रभान कोरडे यांच्या डोक्यावर व छातीवर दगडाचे घाव घातल्याचे दिसून आले. त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने माहिती घेण्यास सुरवात केली. यामध्ये मारोती कोरडे यानेच त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शेतीच्या वादातून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...