आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याचा संशय:औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला शिवारात सापडला मृतदेह

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला शिवारामध्ये दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह एका विहिरीमध्ये सोमवारी (ता. १३) दुपारी आढळला. मृताच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या जखमा असल्यामुळे या तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संजय पवार ( ३०, रा. नहाद) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील नहाद येथील संजय पवार हे मागील दोन दिवसापासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी हट्टा पोलीसांना तोंडी माहिती दिली होती. त्यावरून पोलिसांनीही त्यांची माहिती घेण्यास सुरवात केली होती.

दरम्यान आज दुपारी शिरला शिवारात एका विहिरीमध्ये तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती हटा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार राजेश ठाकूर, भुजंग कोकरे, भारशंकर, वळसे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मयताच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या जखमा असल्याने त्यांचा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरात माहिती घेतली असता सदर मृतदेह संजय पवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केला आहे. मयत संजय यांचे डोक्याला व शरीरावर काही ठिकाणी जखमा असल्यामुळे त्यांचा खून झाला असावा अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...