आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हमी योजनेच्या कामांची सांगड घालून शेतकऱ्यांना लखपती करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

प्रतिनिधी | हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व कामांची सांगड घालून शेतकऱ्यांना हवी असलेली कामे मंजूर केली जाणार आहेत. त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लखपती करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने गट व गण निहाय गावाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे.

हिंगोली जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या संख्येने झाली आहेत. मागील दहा वर्षात सिंचन विहीरीसोबतच इतर कामांचाही समावेश आहे. सिंचन विहीरींना पाणी लागल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येत आहेत. त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावला असून एकरी उत्पादनातही वाढ झाली आहे.

दरम्यान, आता जिल्हयात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, गणेश वाघ यांनी हमी योजनेची कामे मोहिम स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हमी योजने अंतर्गत हिंगोली जिल्हयात शेतकऱ्यांसाठी किती कामे करता येतील याची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढीसाठी कोणत्या कामांचा लाभ देता येईल याचीही माहिती घेण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या गटनिहाय किंवा पंचायत समितीच्या गणामधील काही गावांची प्राधान्याने निवड करून त्याठिकाणी प्रयोगिकतत्वावर कामे सुरु केली जाणार आहेत. त्यासाठी पंचायत विभाग व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालयाने नियोजन सुरु केले आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांत नियोजन झाल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरु केली जाणार आहेत.

शेतकरी लखपती झाला पाहिजे हे उद्दिष्ट- डॉ. विशाल राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी हिंगोली

जिल्हयात हमी योजनेच्या कामांची सांगड घालून प्रत्येक गावांत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना हवी असलेली कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. यातून शेतकऱ्यांना लखपती करण्याचे प्रयत्न आहेत.

बातम्या आणखी आहेत...