आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळसह परिसरातील जैव सृष्टीत नसलेले किंवा लुप्त होणारे ताड, मोह, शिशिर, रिठा या वृक्षांच्या संवर्धनासाठी फुलगाव (ता.भुसावळ) येथील प्रा.के.पी.चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी त्यांनी फुलगाव शिवारातील गावठाण व माळरानावरील झुडपांमधील वारुळ व बिळांमध्ये सीड बॉल सोडून नैसर्गिकपणे ११२ झाडे जगवली आहेत. प्रा. चौधरी सन २००१ पासून हा उपक्रम राबवत आहेत. ते उन्हाळ्याच्या शेवटी झुडपांमध्ये सीड बॉल टाकतात. त्यातून पावसाळ्यांत रोपे उगवतात. काटेरी झुडपांचे नैसर्गिक संरक्षण मिळत असल्याने या रोपांचे संवर्धन होते. या प्रकारे प्रा.चौधरींनी परिसरात कडूनिंब, चिंच, शिसम व अन्य प्रजातींची ११२ झाडे जगवली आहेत. सध्या या झाडांची उंची ५ ते १५ फुटांपर्यंत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात सरपणासाठी अजूनही वृक्षतोड होते. त्यामुळे जळाऊ किंवा घर बांधणीसाठी ज्यांच्या लाकडाचा उपयोग होत नाही, अशा ताड, मोह, रिठा, शिशिर या झाडांची लागवड सीड बॉल पद्धतीने करण्यासाठी चौधरींनी पुढाकार घेतला आहे.
असे होते नैसर्गिक संवर्धन माळरानांवरील काटेरी झुडपांमध्ये उन्हाळ्यात सीड बॉल (बियांना वरुन शेणाचे आवरण) टाकले जाते.पावसाळ्यात त्यातून अंकुर फुटतो. काटेरी झुडपातून हे झाड उगवते. यामुळे गुरा-ढोरांपासून नैसर्गिक संरक्षण होते. झुडपांची उंची सुमारे पाच फुटांपर्यंत असते. तोपर्यंत हे झाड सुरक्षित वाढते. शिवाय त्यांना पाणी देण्याची गरज पडत नाही. याच पद्धतीने फुलगावच्या माळरानावर ११२ झाडे जगली आहेत.
पक्ष्यांची विष्ठा साठवणार पिंपळ, वड, औदुंबर या झाडांची लागवड केली तरी ते लवकर जगत नाहीत, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, पक्षांच्या विष्ठेतून निघणाऱ्या बियाण्यांपासून ही झाडे जगण्याची शक्यता जास्त असते. यामुळे वड, पिंपळाच्या झाडाखाली पडणारी पक्षांची विष्ठा संकलित करुन त्यापासून वड, पिंपळ, औदुंबर आदी वृक्षांची लागवड करता येईल का? याचे संशोधन प्रा. चौधरी यांनी सुरु केले आहे. ^ताड प्रकारातील झाडांमध्ये तारवाली पाकोडी हा पक्षी अधिवास करतो. पिकांवरील अळ्यांचे पतंग या पक्षाचे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे शेतात ताडाचे झाड असल्यास अळ्यांचे पतंग कमी होण्यास मदत होते. प्रा.के.पी.चौधरी, पर्यावरण अभ्यासक, फुलगाव ता.भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.