आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:यावल-भुसावळ बसवर चिंचेचे झाड कोसळून 13 प्रवासी जखमी; चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग केला कमी

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी आगारातून भुसावळसाठी निघालेल्या धावत्या बसवर चिंचेचे झाड कोसळले. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोडे पीर बाबा दर्गाह परिसरात ही अपघात झाला. त्यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, २९ पैकी १३ जणांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यावल आगारातून एमएच.२०-बीएल.२५४२ या क्रमांकाची बस दुपारी दीड वाजता यावल कडून भुसावळसाठी प्रवासी घेवून निघाली होती. ही बस पाटचारीच्या पुढे घोडे पीर बाबा दर्गाह जवळ आलेली असताना वेगाचे वारे वाहत होते. यावेळी चिंचेचे एक झाड कोसळून धावत्या बसकडे झुकले. हे चित्र डोळ्यासमोर पाहून चालक शालिक बारी यांनी प्रसंगावधान राखून बसचा वेग कमी केला. यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. मात्र, पडलेल्या झाडामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. गाडीतील १३ प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जी.पी.जंजाळ यांनी सर्व प्रवाशांना रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. हा अपघात झाला तेव्हा किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन या भागातून जात होत्या.

त्यांनी तातडीने मदत केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.मनीषा महाजन, अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, हेमलता कावडकर, पिंटू बागुल, इरफान तडवी आदींनी प्रथमोपचार केले. आगार व्यवस्थापक जी.पी. जंजाळ, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, सहायक वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी, वाहतूक नियंत्रक के.डी.चौधरी, डी.एन.ठाकरे आदींकडून किरकोळ जखमींना ५००, तर जास्त प्रमाणात जखमींना प्रत्येकी एक हजार अशी १० प्रवाशांना सहा हजारांची मदत करण्यात आली आहे.

बस चालक बारींनी सांगितला थरार
आम्ही साधारण एक वाजता यावलहून निघालो. मी नेहमीसारखा रस्त्यावरील स्थिती व आजूबाजूला लक्ष ठेवून बस चालवत होते. मात्र, पाटचारीच्या पुढे घोडे पीर बाबा दर्गाह परिसरात असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला. सुकलेल्या भल्यामोठ्या चिंचेच्या झाडाजवळ भोवरी तयार झाली. त्यात झाड कोसळू शकते, असा अंदाज आला. यावेळी आमची बस सुमारे ५५ ते ६० किमी प्रतितास वेगात होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी गिअरमध्ये गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करून वेग ३० पर्यंत खाली आणला. पडणाऱ्या झाडापासून वाचण्यासाठी गाडी रस्त्याच्या विरूद्ध दिशेला नेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही बसच्या समोरील भागावर चिंचेच्या झाडाची फांदी पडून दुर्घटना झाली. मात्र, वेग नियंत्रणात आला नसता तर भलेमोठे झाड बसच्या मधोमध पडून अनेकांच्या जीवावर बेतले असते. सुदैवाने हा प्रसंग टळल्याचे बसचालक शालिक बारी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...