आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:केळीचे रॅक उशिरा पोहोचल्याने तब्बल 45 लाखांचे नुकसान ; रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी

सावदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी देखील रडकुंडीला आले आहेत. कारण, यापूर्वी सावद्याहून दिल्लीतील आदर्शनगर मंडीपर्यंत केळी वाहतुकीसाठी वेळेवर वॅगन्स उपलब्ध झाल्या नाहीत. आता बीसीएन वॅगन्स वेळेवर उपलब्ध होत असल्या तरी ही गाडी तिसऱ्या ऐवजी पाचव्या दिवशी दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचते. यामुळे रस्त्यात केळीची प्रतवारी खराब होऊन ती कवडीमोल भावाने विक्री करावी लागते. या पद्धतीने सावद्याहून पाठवलेले तीन रॅक उशिराने पोहोचल्याने शेतकऱ्यांचे तब्बल ४५ लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

डी.के.महाजन, कडू चौधरी, वसंत महाजन, नंदकिशोर महाजन, संतोष पाटील, नरेंद्र सतेजा, प्रवीण डिंगरा, वसंत पाटील, राहुल पाटील, कुंदन सुपे, प्रथमेश डाके या फळ बागायतदार युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सावदा रेल्वे स्थानकावर पत्रकार परिषद घेतली. त्यात रेल्वेद्वारे केळीची वाहतूक तब्बल ८ वर्षे बंद होती. यानंतर महत्प्रयासाने सावदा रेल्वे स्टेशनवरून केळी वाहतूक सुरू झाली. सुरुवातीला किसान एक्स्प्रेस द्वारे केळी दिल्ली येथील आदर्श नगर मंडीत पोहोचत होती. मात्र, उन्हाळ्यात कोळसा वाहतुकीचे कारण पुढे करत अनुदानित किसान एक्स्प्रेस रेल्वे विभागाने बंद केली. शेतकऱ्यांनी पूर्ण भाडे देऊ केल्यानंतर व्हीपीएन बॅगन्स व बीसीएन वॅगन्स उपलब्ध केल्या. मात्र, या वॅगन्स वेळेवर उपलब्ध होत असल्या तरी प्रवासात मध्ये होणाऱ्या विलंबाने आझादपूर मंडीपर्यंत केळी तिसऱ्या ऐवजी पाचव्या दिवशी पोहोचते. यामुळे प्रवासात प्रतवारी खराब होऊन चांगला माल कवडीमोल दराने विक्री करावा लागतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे ४५ लाखांचे नुकसान झाले.

२५० रुपये कमी दराने विक्री
१९, २६ व ३९ ऑगस्ट २०२२ रोजी सावदा येथून दिल्लीतील आदर्श नगर मंडीसाठी बीसीएन वॅगन्समधून केळी पाठवली गेली. हे रॅक तिसऱ्या दिवशी पोहोचणे अपेक्षित होते. प्रत्यक्ष ते पाचव्या दिवशी दुपारी २ वाजता आदर्शनगरला पोहोचले. तोपर्यंत तेथील व्यापारी घरी निघून गेलेले होते. नंतर ही केळी शेतकऱ्यांना १५० ते २५० रुपये कमी दराने विक्री करावी लागली. एका रॅकमध्ये १५ लाखांचा फटका बसला.

इटारसी, झाशी विभागात विलंब
भुसावळ येथून दिल्लीसाठी केळी भरल्यानंतर ती गाडी भुसावळ, झाशी, इटारसी व दिल्ली अशा मंडळांमधून जाते. भुसावळ येथून गाडी निघाल्यानंतर खंडव्यापर्यंत भुसावळ विभागात, तर पुढे इटारसी व झाशी विभागात प्रवेश केल्यानंतर केळीची गाडी आउटरला तासनतास थांबवून ठेवली जाते. यामुळे विलंब होतो, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

आठवडाभरात दिल्लीत घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट
या गलथान कारभारामुळे सावदा फळबागायतदार युनियनचे पदाधिकारी संतप्त आहेत. ते आठवडाभरात दिल्ली येथे जावून रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, सावदा येथील केळीचा रॅक चालवण्यासाठी भुसावळ विभागातून डिझेल इंजिन उपलब्ध झाले. त्यावर चालक (लोको पायलट) मात्र इलेक्ट्रॉनिक इंजिनचे होते, असाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...