आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला मोफत उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजना'' हाती घेतली आहे. या योजनेत शहरातील ५७ हजार ७५९ पात्र लाभार्थींचे गोल्डन कार्ड बनवण्यात येणार आहेत. पैकी ३१ हजार ६४१ म्हणजेच ५४.७८ टक्के लाभार्थींना कार्ड देण्यात आले. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारीपासून शहरात ११६ ठिकाणी शिबिर घेतली. या योजनेंतर्गत शासनाकडून ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. सन २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील ४८ वॉर्डांमध्ये लाभार्थींच्या याद्या तयार केल्या होत्या.
या योजनेच्या माध्यमातून शहरातील तब्बल ५७ हजार ७५९ लाभार्थींना एक रुपयाही खर्च न करता योजनेतून औषधोपचार घेता येतील. मात्र, त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड असणे बंधनकारक आहे. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारीपासून शिबिर लावून ऑनलाइन कार्ड काढून देण्याची योजना हाती घेतली. आतापर्यंत ३१,६४१ लाभार्थींना गोल्डन कार्ड मिळाले. उर्वरित २६ हजार ११८ लाभार्थींना फेब्रुवारी अखेरपर्यंतच हे कार्ड मिळतील. दरम्यान, पालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात शिबिर घेणे सुरू आहे. यासाठी लॅपटॉप, इंटरनेट सुविधेसह तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हा उपक्रम सुरू राहील.
आवश्यकतेनुसार मार्च महिन्यातही शिबिर होईल , अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी दिली. तसेच ज्या लाभार्थींना अजूनही गोल्डन कार्ड मिळाले नसेल त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करून कार्ड प्राप्त करून घ्यावे. आरोग्यविषयक सुविधांसाठी हे कार्ड अतिशय उपयुक्त असल्याचे डॉ.फलटणकर म्हणाल्या.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अशी
आयुष्यमान भारत गोल्डन कार्डसाठी कुटुंबांतील सदस्यांचे आधारकार्ड, रेशनकार्डआणि आधार कार्ड सोबत संलग्न असलेला मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. पालिकेने राबवलेल्या शिबिरांतून ऑनलाइन नोंदणी करुन हे कार्ड लाभार्थींना दिले जात आहे.
काय मिळेल फायदा
योजनेत पात्र कुटुंबांना प्रतिवर्षी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मान्यताप्राप्त सरकारी व खासगी रुग्णालयात संपूर्ण कुटुंबासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. १,३५० आजारांचा समावेश आहे.
कोण करू शकते अर्ज?
सामाजिक, आर्थिक, जाती गणनेच्या (एसईसीसी-२०११) यादीत नाव असलेले अर्ज करु शकतात. यासाठीmera.pmj ay.gov.inया वेबसाइटवर जावून नावाची खातरजमा करता येईल. नाव असेल तर ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करता येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.