आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक अनुष्ठान:शेंदुर्णीत 5 हजार संत येणार 40 दिवस मुक्कामी ; महानुभाव पंथाचा भव्य कार्यक्रम

शेंदुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे ५ डिसेंबरपासून ‘आचार माळीका’ प्रवचन सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे प्रवचन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष अग्नाय आचार्य लोणारकर बाबा महानुभाव (श्री क्षेत्र जाळीचादेव बुलडाणा) हे करणार आहे. ४० दिवस चालणाऱ्या या प्रवचन सोहळ्याला देशभरातून पाच हजार संत, महंतांची उपस्थिती लाभणार आहे. जामनेर रोडवरील गोपाला मेगासिटी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यासाठी पोथी सभामंडप, भजन शामियाना, प्रसादालय, धर्मग्रंथ पुस्तक प्रदर्शन, पाच हजार साधू संतांची निवास व्यवस्था, स्वतंत्र महिला निवास, आचार्य निवास, मोफत दवाखाना, नियंत्रण कक्षासाठी २० एकरात व्यवस्था केलेली आहे. आयोजक महंत पाथरीकर बाबा महानुभाव व महंत गोविंद बाबा सोनारकर महानुभाव हे आहेत. महानुभाव पंथाच्या धार्मिक कार्यक्रमाला पाच हजार महिला पुरुष, साधू संत महंत, उपदेशी, सेवेकरी ४० दिवस मुक्कामी राहणार आहेत. त्यासाठी दोन्ही वेळेला पाच हजारांहून अधिक भाविक व संतांच्या भोजनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. दत्त मंदिर संस्थान शेंदुर्णीचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपदेशी बांधव, नागरिक, भाविक गेल्या महिनाभरापासून परिश्रम घेत आहेत.

४० दिवसीय प्रवचन सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम असे पहाटे साडेचार ते सहा विशेष स्तवन नामस्मरण व आचार्य मालिका प्रवचन, त्यानंतर दूध, चहा, उदक घेतले जाईल. सात वाजता देवपूजा वंदन होईल. सकाळी दहा वाजता गुरुवर्य पूजन, सकाळी ११.३० वाजता उपहार आरती त्यानंतर भोजन होईल. दुपारी २.४५ ते ४.४५ या काळात आचार मालिका प्रवचन होईल. सायंकाळी ५ वाजता देवपूजा वंदन, सायंकाळी ६ वाजता संत भेट काळ, ६.३० वाजता उपहार आरती भोजन होईल. रात्री ८ वाजता साधक गौरव आणि प्रवचन कार्यक्रम महिनाभर होईल. दिनांक १७, १८, १९ रोजी तीन दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार अष्टशताब्दी महोत्सव, संन्यास दीक्षा विधी अखिल भारतीय महानुभाव अधिवेशन होईल.

बातम्या आणखी आहेत...