आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका:भुसावळात 16 ठिकाणी 502 ब्रास अवैध वाळू; साठे करणाऱ्यांना देणार नोटीस

भुसावळ2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात तब्बल १६ ठिकाणी छापे टाकून ५०२ ब्रास अवैध वाळू साठा पकडला. पंचनामा व ताबे पावती करून हा वाळू साठा संबंधितांकडे सोपवण्यात आला. गुरुवारच्या या कारवाईतील सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. महसूल विभागाचे जिल्हा गाैणखनिज अधिकारी दीपक चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे.इंगळे व त्यांच्या पथकाने दुपारी १२ वाजेपासून सुरू केलेली कारवाई सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती.

जळगाव येथील दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारात माहिती काढली. यानंतर शहरात अवैध वाळू साठा असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हा गाैणखनिज अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे.इंगळे, मंडळाधिकारी सतीश इंगळे, तलाठी पवन नवगाळे विनोद बारी, दिलीप पवार, भगवान शिरसाठ, महेश सपकाळे, मिलिंद तायडे, जितू चाैधरी यांच्या पथकाने हा ५०२ ब्रास अवैध वाळू साठा पकडला.

आज बजावणार नोटीस
महसूल विभागाने पंचनामे केल्यावर अवैध वाळूसाठे आढळलेल्या संबंधितांना शुक्रवारी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मालकांनी त्यांच्याकडे सापडलेल्या वाळूबाबत महसूल विभागाला खुलासा करायचा आहे, अशी माहिती नायब तहसीलदार एस.जे. इंगळे यांनी सांगितले. त्यांचा काय खुलासा येतो? यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

९ हजार रुपयांचे डंपर १३ हजारांवर
जिल्ह्यात ९ जूनपासून वाळूचा ठेका बंद आहे. तरीही भुसावळात जळगाव तालुक्यातून रात्री ९ ते पहाटेपर्यंत सुमारे ५० डंपर वाळूची चोरटी वाहतूक करतात. या तस्करीमुळे गेल्या महिन्यात ९ हजार रुपये डंपर (तीन ब्रास) प्रमाणे मिळणाऱ्या वाळूचे दर तब्बल १३ हजारांपर्यंत पोहोचले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास जुलै ते सप्टेंबरदरम्यान ते २० हजारांपर्यंत जाण्याचे अंदाज आहे. याचा लाभ घेण्यासाठी माफियांनी अवैध वाळू साठे करून ठेवला आहे.

अशी होते वाहतूक
जळगावातील खेडी, आव्हाणे, फुफनगरी व बांभोरी येथून गिरणेतील वाळू घेऊन डंपर चोर रस्त्यांनी नशिराबाद टोल नाका चुकवून भादली रेल्वे गेट, कडगाव, शेळगाव मार्गे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजजवळून महामार्गावर येतात. नशिराबाद-सुनसगाव, कुऱ्हा मार्गे भुसावळ असा दुसरा मार्ग आहे.

वाळू माफियांचे एजंट
जळगाव तालुक्यातील वाळू तस्करांचे भुसावळात १५ मोठे व २३ ते २५ लहान एजंट आहेत. यातील अनेक जणांचा सायंकाळी खडका चौफुलीवर ठिय्या असतो. या एजंट लोकांना प्रती डंपर दीड ते दोन हजार रुपये मिळतात. मात्र, यासाठी डंपर महामार्गावरून थेट वाळू उपसा होणाऱ्या बांधकामापर्यंत नेणे व पैशांची जबाबदारी त्यांची असते.

जीवघेणी वाहतूक
एक डंपर अवैध वाळू वाहतुकीमधून मूळ मालकाला चार ते पाच हजार रुपये सुटतात. यामुळे रात्रीतून किमान चार ते पाच फेऱ्या मारल्या जातात. अधिक फेऱ्या मारण्याच्या टार्गेटमुळे रात्री महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग ताशी ९० ते १३० किमी पेक्षा जास्त असतो. यामुळे प्राणांतिक अपघाताचा धोका वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...