आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी सकाळी १०.४० वाजता बोदवडमध्ये आलेल्या भुसावळ-हरणखेडा बसचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून बाजूच्या दुभाजकाला बस धडकवली. यामुळे सर्व ५३ प्रवासी सुखरूप बचावले. मात्र, बसच्या धडकेत एक दुचाकी चाकाखाली येऊन चक्काचूर झाली.भुसावळकडून आलेली हरणखेडा बस (एमएच.२०-बीएल.९४८) बोदवड बसस्थानकाकडे जात होती. जुन्या तहसील कार्यालयासमोरील थांब्यावर काही प्रवासी या बसमधून खाली उतरले. नंतर जेमतेम १०० मीटर अंतरावर गेलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक राजेंद्र बारी यांच्या लक्षात आले.
यामुळे त्यांनी गिअर बदलून बसचा वेग कमी केला. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल व नंदिनी साडी सेंटरसमोर गटारीचे काम सुरू असल्याने तिथे सिमेंटचे दुभाजक ठेवल्याचे दिसले. चालक बारी यांनी या दुभाजकाला धडक देऊन बस थांबवली. या प्रयत्नात तिथे उभी असलेली दुचाकी (क्रमांक ४२७१) बसच्या पुढच्या चाकाखाली दाबली गेली. या बसमध्ये ५३ प्रवासी होते. कुणाला काहीही इजा झाली नाही. चालक राजेंद्र बारी, वाहक प्रदीप बराटे यांनी प्रसंगावधान राखले. त्यांचे अनेकांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.