आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी घ्या:ओपीडीतील ६०% रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याचे; डेंग्यूचा विळखाही घट्ट

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना शहरात व्हायरल व डेंग्यू सदृश रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयातील दररोजची ओपीडी १५० वर पोहोचली असून त्यात ६० टक्के रुग्ण सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी या लक्षणांचे आहेत. सरासरी तीन ते चार दिवसांच्या उपचारानंतर हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. दरम्यान, गेल्या पंधरवड्यात शहरात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. पाच दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण देखील आढळले आहेत.

सलग पाऊस, वातावरणातील बदल, अशुद्ध व गाळ मिश्रित पाणीपुरवठा, डासांचा वाढलेला उद्रेक यामुळे शहरात व्हायरल रुग्णांसह डेंग्यू सदृश, टायफाईड, काविळीच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात दररोजची ओपीडी ९० ते १०० वरुन आता १२५ ते १५०पर्यंत पोहोचली आहे. यातील ६० टक्के रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचा त्रास आहे. दुसरीकडे गेल्या पाच दिवसांत शहरात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले. त्यापैकी २ शहरी तर १ ग्रामीण भागातील आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या पंधरवड्यात स्वाइन फ्लूचे २ रुग्ण आढळले होते. जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचाराअंती ते बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

स्वाईन फ्लू किटसाठी हालचाली : स्वाईन फ्लू सदृश रुग्णांची एन १ एच १ तपासणी करण्याची सुविधा शहरात नाही. यामुळे खासगी लॅबच्या माध्यमातून नमुने घेवून ते तपासणीसाठी मुंबई किंवा पुण्याला पाठवावे लागतात. कोरोना सारखीच स्वाइन फ्लूची रॅपीड टेस्ट किटवर केली जाऊ शकते. मात्र, या किट जिल्हाभरात कुठेही उपलब्ध नाहीत. शहरातील खासगी लॅबमध्ये त्या ठेवता येतील का? याबाबत आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.

घाबरू नका, ९०% रुग्ण चार दिवसांत होतात बरे
शहरात व्हायरल आजारांनी डोके वर काढल्याचे दिसते. त्यात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण जास्त आहे. यामुळे शक्यतो मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सध्या आढळणारे ९० टक्के रुग्ण तीन ते चार दिवसांचे उपचार घेतल्यावर ठिक होत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये.
डॉ. कीर्ती फलटणकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पालिका

..तर जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवणार
शहरात स्वाइन फ्लू सदृश आजारांचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सूचनेनुसार पाच दिवसांत उपचार होऊनही आजार कायम असलेल्या रुग्णांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात येईल. स्वाइन फ्लू सदृश म्हणून अशा रुग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. मात्र, शहरातील ९० टक्के रुग्ण तीन ते चार दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत.

खासगी डॉक्टरांना दिले पत्र... ३ डेंग्यू रुग्णांवर सध्या शहरात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व जनरल प्रॅक्टिशनर्स व एमडी डॉक्टरांना डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्याचे नाव व पत्ता कळवण्यासाठी पत्र दिले आहे. यामुळे संबंधित भागात कंटेनर सर्वेक्षण व फवारणी करणे पालिकेला सोयीचे होईल.

बातम्या आणखी आहेत...