आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:कुंभारखेडा, गौरखेडा, अहिरवाडीत 61 घरांची पडझड; 17 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी ३१ मे रोजी रावेर तालुक्यातील १५ गावांना वादळी पावसाचा फटका बसला. त्यात अहिरवाडी, पाडळे बुद्रूक, पाडळे खुर्द, पिंप्री, मोहगण बुद्रूक, निरुळ, केऱ्हाळे बुद्रूक, खानापूर, चोरवड, अजनाड, चिनावल, गौरखेडा, कुंभारखेडा, सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द या १५ गावांच्या शिवारात कापणीवरील केळीचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने या वादळग्रस्त भागाची पाहणी व पंचनामे केले. त्यात ५७६ शेतकऱ्यांच्या ४७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. याशिवाय अहिरवाडीत ५, गौरखेडा २५ येथील आणि कुंभारखेडा ३१ अशा ६१ घरांची पडझड, पत्रे उडाली. चिनावल येथे २ जनावरे मृत झाली. यंदा पावसाला सुरूवात होण्यापूर्वी रावेर तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला. त्यात ठिकठिकाणी वीज तारा तुटल्या. तीन उच्च दाब वाहिनीचे खांब व ३२ लघुदाब वाहिनीचे असे एकूण ३५ विद्युत खांबांचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. वरील १५ गावांमध्ये सुमारे १७ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तर वादळ ग्रस्त शेती परिसरातील वीज तारा तुटल्याने व खांब वाकल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास किमान दोन दिवस लागतील असे रावेर विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल चौधरी यांनी सांगितले. अहिरवाडी-पाडळे रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. दरम्यान, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, काँग्रेसचे धनंजय चौधरी यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर जिल्ह्यात ३१ मे रोजी अवकाळी पाऊस, वादळ व गारपीटीमुळे रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील ५५ गावांत ९५५ शेतकऱ्यांचे ७६६ हेक्टरवरील केळी पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त निकषांनुसार ५ कोटींचे नुकसान झाले. बुधवारी कृषी विभागातर्फे प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. ही माहिती उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.

यावल | तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने २४७ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले. वादळात कापणी योग्य केळी जमीनदोस्त झाली. बुधवारी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. तसेच प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. यावल तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळासह पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. त्यात यावल महसूल मंडळातील ६ गावे, भालोद मंडळ ३ गावे, फैजपूर मंडळ ६, साकळी ९ आणि किनगाव महसूल मंडळातील ९ अशा एकूण ३३ गावांच्या शिवारांना फटका बसला. ३०४ शेतकऱ्यांची २४७ हेक्टर कापणी योग्य केळी पीक मातीमोल झाले. या संदर्भातील प्राथमिक अहवाल त्रिसदस्यीय समितीने बुधवारी सायंकाळी सादर केला. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून आता प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन पंचनामे केले.

बातम्या आणखी आहेत...