आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:653 घरे सौर पॅनलने वर्षभरात करतात 1 कोटी 20 लाख युनिट विजेची निर्मिती

हेमंत जोशी | भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजबिलात होणाऱ्या वाढीमुळे ग्राहक आता अपारंपरिक उर्जा स्त्रोतांकडे वळले आहेत. एकट्या भुसावळ शहरातच तब्बल ६५३ ग्राहकांनी घरांच्या छतावर सौर उर्जा पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरु केली आहे. तेथील ३५२५ किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनलमधून वर्षभरात सुमारे १ कोटी २० लाख युनिट वीजनिर्मिती होते. घरातील विजेची गरज भागवून शिल्लक २० लाख युनिट वीज ग्राहकांकडून महावितरणच्या ग्रीडमध्ये दिली जाते. याचा आर्थिक मोबदला मिळत नसला तरी पावसाळा व ढगाळ वातावरणात जेव्हा कमी सौर ऊर्जा तयार होते, तेव्हा महावितरण ग्राहकांना गरजेनुसार वीज पुरवते.

वीजबिलांमुळे दिवाळे निघते अशी ओरड होते. त्यामुळे एकाचवेळी गुंतवणूक करुन घरांवर सोलर पॅनल बसवून वीजर्निमितीकडे कल आहे. शहरात ६५३ घरांवर सोलर उर्जा निर्मिती होते. दरमहा हे प्रमाण किमान १२ ते १५ ग्राहक असे आहे. दरम्यान, सौर उर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना जवळपास शून्य वीज बिल असते. केवळ महावितरणच्या मीटरचे भाडे किंवा एखाद्या महिन्यात सौरउर्जेपेक्षा अधिक विजेचा वापर केल्यास बिल भरावे लागते. एरवी वीज वापर नसल्याने महावितरणचे बिल शून्य असते.

ऑक्टोबरमध्ये १० लाख युनिट निर्मिती : ऑक्टोबर महिन्यात शहरातील ग्राहकांच्या छतावरुन १० लाख युनिट वीजनिर्मिती झाली. यातून महावितरणच्या ग्रीडमध्ये अडीच लाख युनिट वीज मिळाली. एप्रिल ते जून या महिन्यात ही निर्मिती साडेचार लाख युनिटपर्यंत पोहोचते. या काळात घरातील विजेचाही वापर जास्त असतो. यामुळे महावितरणच्या ग्रीडपर्यंत कमी वीज मिळते. सध्या हिवाळ्यात नागरिकांचा वापर कमी आहे. कोरड्या हवामानामुळे विजेची निर्मितीही अधिक होतेय.

अशी आहे प्रक्रिया अन् वीजबिलाचा हिशेब
सौर उर्जा निर्मिती पॅनलद्वारे तयार झालेली वीज डीसी प्रकारातील असते. इन्व्हर्टरचा वापर करुन ती एसी म्हणजेच अल्टरनेट करंटमध्ये रुपांतरीत होते. महावितरण कंपनीमार्फत टू वे मीटरच्या माध्यमातून या ग्राहकांनी निर्मिती केलेल्या व वापरलेल्या विजेचा हिशेब ठेवला जातो.

ग्राहकांनी अतिरिक्त वीज दिली असेल तर पावसाळ्यात ज्यावेळी सौर उर्जेची निर्मिती कमी होते, अशा वेळी ही वीज महावितरण ग्राहकांना देते. म्हणजेच विजेच्या मोबदल्यात आवश्यकता असते तेव्हा वीज मिळते. ग्राहक अधिक क्षमतेचे पॅनल बसवून आवश्यकतेनुसार वीज वापर करुन उर्वरित वीज महावितरणला देतात. ग्रीडद्वारे ती वापरली जाते.

दोन वर्षांत दुप्पट वापर होईल
शहरात दरमहा किमान १२ ते १५ नवीन सौर पॅनल उभारणी होत आहे. हे प्रमाण दोन वर्षांत दुप्पटीने वाढेल. घरगुती ग्राहकांसह हॉटेल, रुग्णालये, लॉजिंग बोर्डिंग आदी ठिकाणीही सौर उर्जेचा वापर होतो. अपार्टमेंटमधील सार्वजनिक जोडणीच्या कनेक्शनवरही सौर उर्जेचा वापर केला जात आहे. एकाचवेळी गुंतवणूक करुन बहुवार्षिक वीज बिल कमी होत असल्याने ग्राहक हा पर्याय निवडत आहेत.

४० प्रकरणे प्रक्रियेत
महावितरणकडे दरमहा सौर ऊर्जेसाठी १२ ते १५ प्रकरणे येतात. सध्या ४० प्रकरणे प्रक्रियेत आहेत. शहरात उन्हाळ्यातील एप्रिल ते जूनदरम्यान जास्त तापमान असते. यामुळे अधिक वीजनिर्मिती होते. ही अतिरिक्त वीज ग्राहक पावसाळा किंवा ढगाळ वातावरणात वापरु शकतात. सौर उर्जा किफायतशीर असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे. -जी.एस.महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भुसावळ

एका घरात होतो दररोज ६ युनिट वापर
एका घरात ३ पंखे, एक फ्रीज, ८ एलईडी दिवे, एक पाण्याची मोटार, टीव्ही, मिक्सर ही उपकरणे असतील तर दिवसाला सरासरी ६ युनिटपर्यंत वीज वापर होतो.

बातम्या आणखी आहेत...