आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलजीवन मिशन:प्रभाग 7 मधील 7 हजार रहिवाशांची 20 वर्षांच्या टंचाईतून होणार सुटका; जलकुंभाचे काम वेगाने,20 किमीची पाइपलाइन

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जळगाव रोडवरील प्रभाग ७ मधील पालिका हद्दीबाहेरील भाग साकेगाव ग्रामपंचायत हद्दीत येतो. या भागात सात हजार लोकसंख्येचा रहिवास आहे. येथील पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी या भागाचा जलजीवन मिशनमध्ये समावेश करण्यात आला. त्यात नवीन जलकुंभ व २० किमी पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करून सात हजार नागरिकांची गेल्या २० वर्षांपासूनच्या पाणीटंचाईतून सुटका होईल.

प्रभाग ७मधील आयोध्या नगर, स्वरुप कॉलनीसह परिसर शहरात असला तरी पालिका हद्दीबाहेर येतो. या भागाला गेल्या २० वर्षांपासून टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र, साकेगावसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यात पालिका हद्दीबाहेरील भागाचा समावेश केला आहे. नवीन योजनेतून या भागासाठी १ लाख १५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारणे सुरू आहे. सध्या स्लॅब लेव्हल पर्यंत काम पूर्ण झाले. या आठवडाभरातच २० किमी लांबीच्या पाइपलाइनचे काम सुरु होईल. यात ९०, १२५, १४० मिमी व्यासाच्या पाइपलाइन टाकली जाईल. अवघ्या सहा महिन्यांत योजनेचे काम पूर्ण होणार असल्याने सात हजार लोकसंख्येचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटेल.

साकेगावातून साडेतीन किमीची जोडणी : प्रभाग ७ मधील निर्माणाधीन जलकुंभात पाणी टाकण्यासाठी साकेगावातील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापासून साडेतीन किमी अंतराची १६० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकली जाईल. या पाइपलाइने कामही लवकरच सुरु होईल.

अजून एक जलकुंभ प्रस्तावित, पाणीप्रश्न कायमचा सुटणार
जळगाव रोडवरील पालिका हद्दीबाहेरील भागात १ लाख १५ हजार लिटरच्या जलकुंभाचे काम सुरु झाले. या भागात पुन्हा एक जलकुंभ प्रस्तावित आहे. यामुळे या भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल. शहरातील अमृत योजनेपेक्षा हे काम लवकर होईल. संजय सावकारे, आमदार

या भागांना दिलासा
प्रभाग सातमधील महालक्ष्मी नगर, अयोध्यानगर, स्वरुप कॉलनी, गोदावरी नगर, नारायण नगर फेज १ ते ३, स्वामी विहार, मोरेश्वर नगर, वल्लभ नगर, सिताराम नगर, वरद विनायक कॉलनी, ठोके नगर, भाग्यश्री विहार या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

७ महिने टँकरने भागते तहान
प्रभाग सातमधील पालिका हद्दीबाहेरील भागात पाइपलाइन नाही. खासगी कूपनलिकांद्वारे तहान भागते. पावसाळ्यात ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान कूपनलिकांमधून पाणी मिळते. यानंतर कूपनलिका आटून वर्षभरातून सात महिने या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या उन्हाळ्यात या भागात माजी नगरसेविका अनिता सपकाळे, माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी टँकर पुरवले. मात्र, नवीन योजने नंतर हा भाग टँकरमुक्त होईल.

बातम्या आणखी आहेत...