आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारचा निर्णय:पाचोरा-बोदवडदरम्यान ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 955 कोटी मंजूर ; उन्मेष पाटील यांची माहिती

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा पाचोरा-जामनेर (पी.जे.) ही ब्रिटिशकालीन रेल्वे कोविड काळानंतर बंद करण्यात आली होती. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करुन त्याचा बोदवडपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी ९५५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. पीजे रेल्वेच्या फलाटावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. ब्रॉडगेजसाठी निधी मंजूर झाल्याचे श्रेय माझे एकट्याचे नसून पीजे रेल्वे बचाव कृती समिती व खासदार रक्षा खडसे यांचाही त्यात वाटा आहे, असे खासदार पाटील म्हणाले. ब्रॉडगेज रेल्वेमार्गामुळे पाचोरा तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असेही खासदारांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीत पीजे रेल्वे बचाव कृती समिती अध्यक्ष खलिल देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, अॅड.अविनाश भालेराव, भरत खंडेलवाल, मनीष बाविस्कर, विकास वाघ, सदाशिव पाटील, अॅड.आण्णासाहेब भोईटे, प्रताप पाटील, मंगेश पाटील, रणजित पाटील, व्ही.टी.जोशी, कांतीलाल जैन, संजय जडे, धनराज पाटील, दीपक पाटील, दीपक माने, राजू पाटील, अनिल येवले, पप्पू राजपूत, अशोक कदम, पुंडलिक पाटील, गणेश पाटील, नंदू सोनार, शहाबाज बागवान, सोमनाथ पाटील, समाधान मुळे, भैय्या ठाकूर, मिलिंद सोनवणे, विवेक पाटील, नगराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्पन्न अन् खर्चाचे गणित बिघडल्याने नॅरोगेज बंद

कोविड काळात देशात सुमारे ९०० प्रवाशी रेल्वेगाडया बंद झाल्या. त्यापैकी काही गाड्या नंतर सुरु झाल्या. मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने पीजे नॅरोगज रेल्वमार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. नंतर पीजे बचाव कृती समितीने उभारलेल्या जनआंदोलनात वस्तुस्थिती जाणून घेत दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला.

या मुद्द्यांवर केला पाठपुरावा

भुसावळ येथे तासनतास उभ्या राहत असलेल्या मालगाड्यांना बोदवडमार्गे पाचोरा वळवल्यास रेल्वेच्या रहदारीचा प्रश्न सुटेल. तसेच नागपूर ते मुंबई मालवाहतुकीला सोयीचा रेल्वेमार्ग उपलब्ध होईल. हे मुद्दे पटवून देण्यासोबत प्रवाशी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने या मार्गाला मंजुरी मिळावी हे ठामपणे मांडण्यात यश मिळाले, असे खासदार पाटील यांनी सांगितले.

विभागनिहाय निधी असा... ​​​​​​​

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत पाचोरा ते बोदवड ब्रॉडगेज महामार्गाचा डी.पी.आर. तयार करून त्याला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागासाठी ७१३.३९ कोटी, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागासाठी १३४ कोटी, सिग्नल अॅण्ड टेलिकॉम विभागासाठी १०२.८९ कोटी व मॅकनिकल इंजिनिअरिंगसाठी ५.११ कोटी असा एकूण ९५५.३९ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे, असे खासदारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...