आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुराखी तापीत बेपत्ता:बैलांना अंघोळ घालताना लोणवाडीत शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू

जामठी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशीच (दि.२६) ही दुर्दैवी घटना घडली. विनोद वसंत चौधरी (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपळगाव देवी रस्त्याजवळील बोरलोन या ठिकाणी असलेल्या तलावात, ते बैल धुण्यासाठी गेले होते. बैलांना अंघोळ घालत असताना अचानक बैल बिथरले. तसेच बैल तलावातील खोल पाण्यात शिरले. यावेळी शेतकरी चौधरी यांनी बैलांचे दोर हात धरुन ठेवले होते. त्यामुळे ते देखील बैलांसोबत पाण्यात ओढले गेले. तलावातील गाळामधे फसत असल्याचे लक्षात, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी विनोद चौधरी यांना तलावाबाहेर काढले. जामठी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लोणवाडी गावावर पोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

गावात झाला नाही पोळा
शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर लोणवाडीत पोळा साजरा झाला नाही. गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली नाही. चौधरी हे दुसऱ्यांची शेती नफ्याने करत होते. त्यांनी बैल जोडी घेतलेली होती. ट्रॅक्टरचालक म्हणूनही ते काम करत होते. त्यांची मुलगी दहावीत शिक्षण घेत असून मुलगा तिसरीत आहे. विनोद चौधरी हे घरातील एकमेव कमावते होते.

गुराखी तापीत बेपत्ता
तालुक्यातील थोरगव्हाण येथील गुराखी तापी पात्रात शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाला. मनोहर भाऊलाल पाटील (वय ४५) असे त्या गुराखीचे नाव आहे. ते गुरे चारण्यासाठी तापीच्या काठार गेले होते. गावातील शेतकरी बैल धुण्यासाठी गेले, त्यावेळी पाटील यांचे कपडे नदीकाठावर दिसले. सायंकाळपर्यंत तपास लागला नाही.

बातम्या आणखी आहेत...