आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जिवंत ठेवण्याचे व गतिमान करण्याचे कार्य कलावंतांनी गायनाच्या माध्यमातून केले आहे. वामन दादानंतर त्यातील मोठे नाव म्हणजेच प्रतापसिंग बोदडे यांचे आहे. या महान कवी, गायक, प्रबोधनकार कलावंताचे मुक्ताईनगरात भव्य असे स्मारक उभारण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली. मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, भुसावळचे माजी नगरसेवक रवी सपकाळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री रामदास आठवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. नंतर दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नंतर प्रभाकर पोखरीकर, दत्ताजी शिंदे, शाहीर राजेंद्र कांबळे, वैशाली शिंदे, राजू बागुल, शकुंतला जाधव, मुकुंद ओव्हाळ, चंद्रकला गायकवाड, अशोक निकाळजे, प्रकाश वानखेडे, मैना कोकाटे, प्रमोदिनी साठे, प्रेम धांदे, संतोष गाडे, नंदा नांद्रेकर, कैलास सकपाळ, शाहीर शिवाजी कांबळे, सपना खरात, गणिता गव्हाळे, देविदास येवले, मदन वरगट, शेषराव मेश्राम यांच्यासह असंख्य कवी, गायक कलावंतांनी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना आपल्या गीतांतून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमानंतर मंत्री आठवले यांनी बोदडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. शासनातर्फे त्यांना पाच लाखांचा निधी देण्याचे घोषित केले.
अभिवादन सभा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष महेंद्र हिरोळे यांच्यासह जिल्हा, तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रिपाइंचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.