आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात उभारणार सौरऊर्जेवरील हायड्रोजन निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प

हेमंत जाेशी | भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनरेटर कूलिंगमध्ये उपयोगासह या ग्रीन एनर्जीवर २०३० पर्यंत धावतील कार
  • प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यात सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत होणार प्रकल्प; वीज-कोळशाची बचत, प्रदूषणही कमी

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात ग्रीन हायड्राेजन निर्मितीला शासनाने मंजुरी देत १५.७ काेटींची तरतूद केली आहे. यात सौरऊर्जेचा वापर होणार असल्याने हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज व विजेसाठी लागणारा कोळसाही वाचेल, कार्बन उत्सर्जन घटेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील सातही केंद्रांत तो राबवला जाईल. विद्युत केंद्रांत जनरेटर कूलिंगसाठी हायड्रोजनचा वापर होतो. उत्पादन वाढले तर त्याचा वापर इंधन स्वरूपात होऊ शकेल. २०३० पर्यंत ५ दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन इंधनाचे उत्पादन करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. यामुळे ग्रीन एनर्जीवर २०३० पर्यंत कारही धावतील.

कार्बन उत्सर्जन आटोक्यात
राज्यात ७ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये जनरेटर कूलिंगसाठी रोज ६७० क्युबिक मीटर हायड्रोजन वापरला जातो. या वायूच्या निर्मितीसाठी याच केंद्रांमध्ये तयार हाेणारी २८०० किलाेवॅट वीज वापरली जाते. यापुढे या कामासाठी सौरऊर्जा वापरली जाणार असल्याने या विजेच्या निर्मितीसाठी लागणारा ६० टन काेळसा वाचणार आहे. त्यातून रोज हाेणारे तब्बल १८०० किलाे कार्बन उत्सर्जन वाचून प्रदूषण कमी होण्यास मदत हाेणार आहे.

हायड्रोजन निर्मितीचे असेही फायदे
हायड्रोजन ज्वलनामुळे प्रदूषण नगण्य असेल. हा वायू इंधन म्हणून नियमित वापरात आला तर पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत हे इंधन अतिशय स्वस्त असेल. हायड्रोजन निर्मितीची क्षमता वाढल्यास घरांमधून विजेच्या रूपातही या ऊर्जेचा वापर होऊ शकेल. इलेक्ट्रोलायझर प्रक्रिया ग्रीन हायड्रोजनसाठी उपयुक्त आहे. कार्बनमुक्त ग्रीन हायड्रोजन रिफायनरी, खतनिर्मिती उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र आणि पोलाद उद्योगातसुद्धा ऊर्जा म्हणून याचा वापर केला जाऊ शकेल.

2800 किलाेवॅट वीज वाचेल सध्या हायड्रोजन निर्मितीसाठी लागणारी 1800 किलाे इतके प्रकल्पातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल 60 टन काेळसा वाचेल, कार्बन उत्सर्जनाचे प्रदूषणही कमी होईल

हायड्रोजन निर्मिती स्वस्त
औष्णिक केंद्रांमध्ये पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार वायूची निर्मिती केवळ दिवसाच होते. रात्री ही प्रक्रिया बंद असते. त्यामुळे दिवसा हायड्रोजन निर्मितीसाठी सौर पॅनलवरून अपारंपरिक ऊर्जास्रोत मिळू शकेल. सध्या खर्चिक मानली जाणारी हायड्रोजन गॅस निर्मिती सौरऊर्जेच्या वापरामुळे स्वस्त होईल.

८५,१६६ युनिटची बचत
औष्णिक केंद्रांमध्ये हायड्रोजन निर्मितीसाठी ग्रीन एनर्जीचा वापर झाल्यास दररोज २८०० किलोवॅट, तर वर्षाला १० लाख २२ हजार किलोवॅट विजेची बचत होईल. वर्षाला ८५ हजार १६६ युनिट विजेची बचत होऊ शकणार आहे. भुसावळसारख्या शहराला एक दिवस पुरेल इतक्या विजेची बचत होईल.

१ युनिट : ०.७ कि. कोळसा
एका युनिट विजेच्या निर्मितीसाठी अशा प्रकल्पांमध्ये ०.७ किलोग्रॅम कोळसा जाळला जातो. यामुळे ८५ हजार १६६ युनिट विजेच्या निर्मितीसाठी सरासरी ६० टन कोळशाचा वापर होतो. हायड्रोजन निर्मितीसाठी ग्रीन एनर्जीचा वापर झाल्यास इतक्या कोळशाची बचत होऊन कार्बन उत्सर्जन टळणार आहे.

लवकरच काम सुरू होईल
राज्य शासनाने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पास मंजुरी दिली आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच काम सुरू होईल. सध्या हायड्रोजन निर्मितीसाठी होणाऱ्या विजेच्या वापराऐवजी सौरऊर्जेचा वापर होईल. हा प्रकल्प यशस्वी झाला तर राज्यात इतर केंद्रांतही तो राबवला जाणार असल्याने अधिक फायदा होईल.
-मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, भुसावळ वीजनिर्मिती केंद्र, दीपनगर