आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:सरासरी वीजबिलांचा शॉक; अवेळी रीडिंगमुळे विलंब शुल्काचाही भार

हेमंत जोशी | भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणने शहरात ४७ हजार २३३ पैकी ४० हजार ९७९ ग्राहकांकडे आयआर-आरएफ (रेडिओ फ्रिक्वेन्सी) वीज मीटर बसवले. या मीटरचे स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेतले जाते. मात्र, अजूनही ६ हजार २५४ ग्राहकांकडे जुन्या पद्धतीने वीजमिटर आहे. या जुन्या पद्धतीच्या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महावितरणकडे स्थानिक सक्षम एजन्सी नाही. यामुळे यापैकी बहुतांश ग्राहकांना डोळे पांढरे होतील एवढ्या रकमेचे सरासरी वीज बिल हाती टेकवले जाते. महावितरणच्या चुकीमुळे अतिरिक्त विलंब शुल्काचा भुर्दंड देखील ग्राहकांच्या माथी पडतो.

शहरातील ज्या ग्राहकांकडे आरआय आरएफ मीटर नाही, त्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने मनुष्यबळाचा वापर करुन रीडिंग घ्यावे लागते. तसेच शहरातील सर्व ४७ हजार २३३ ग्राहकांकडे वीज बिलांचे वितरण करावे लागते. या कामांसाठी गेल्या वर्षभरापासून महावितरणकडे स्थानिक ठेकेदार नाही. यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल दिले जाते. काही ग्राहकांना मिळालेल्या बिलाचा आकडा लाखाच्या वर आहे. दुसरीकडे अनेक ग्राहकांना अखेरच्या दिवशी बिल मिळते. त्यामुळे मुदतीनंतर बिल भरल्यास १० ते ३० रुपये विलंब शुल्क भरावे लागते.

केस क्रमांक १ : अनंत माधव गुरव ११७७५३०६८३११ : अत्यल्प वापर असलेल्या या ग्राहकाला महावितरणने तीन महिन्यांचे सरासरी १९ हजार १८४ रुपये बिल दिले. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष वीज बिलाच्या युनिटची पडताळणी करण्यात आली. यानंतर १६,९४४ रुपयांचे बिल कमी करण्यात आले.

केस क्रमांक २ : पद्मावती अपार्टमेंट ११७७५४१४००६७ :
महावितरणने सन २०१९ पासून सरासरी वीज बिले दिले, तर ऑगस्ट महिन्यात अचानक २ लाख ९३ हजार ७७० रुपयांचे बिल दिले. महावितरणकडे तक्रार करुनही उपयोग झाला नाही. मीटर तपासणीची मागणी असताना अधिकारी केवळ पॅरलल मीटर बसवून तपासणी करुन देण्याचे उत्तरे देतात.

केस क्रमांक ३ : राजेंद्र टिळकराज कपूर ११७७५५००१२५५१ :
या ग्राहकास महावितरणने ९ महिन्यांचे ७६ हजार ९५० रुपये वीज बिल दिले. या ग्राहकाने गेल्या महिनाभरापासून महावितरण कंपनीकडे फेऱ्या मारल्या. तक्रारी व अर्ज केल्यानंतर २५ हजार ४१४ रुपये कमी करुन ५१ हजार ५३६ रुपयांचे बिल हाती टेकवण्यात आले.

केस क्रमांक ४ : संदीप वामनराव सोनवणे ११७७५८४६०४२२ :
महावितरणने या ग्राहकास चार महिन्यांचे रीडिंग न घेताच ६५ हजार ५४० रुपयांचे सरासरी बिल दिले. या संदर्भात तक्रार केल्यानंतर या ग्राहकाचे ४७ हजार २७० रुपये बिल कमी झाले. मात्र, उर्वरित बिलाची रक्कम देखील वापराच्या तुलनेत अधिक असल्याचा सोनवणे यांचा आक्षेप आहे. पण, प्रतिसाद नाही.

पर्याय : स्थानिक एजन्सी हवी
शहरात वीज मीटरचे रीडिंग व बिल वितरणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर पात्र सक्षम एजन्सीला काम देणे हा पर्याय आहे. कारण, स्थानिक कामगारांना शहराच्या गल्लीबोळांची माहिती असते. यामुळे वेळेवर रीडिंग व बिल वाटप शक्य होईल. शिवाय सर्व ग्राहकांकडे नवीन आरएफ प्रकारातील मीटर बसवले जावे.

तक्रारी आता कमी झाल्या
सध्या जळगाव येथील कंत्राटदाराला काम दिले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आता तक्रारी कमी आहेत. ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर तक्रारींची संख्या अजून कमी होईल.
प्रदीप घोरुडे, कार्यकारी अभियंता, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...