आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याच दिवशी पाच वर्षांनी न्यायालयाने सुनावली शिक्षा:खूनप्रकरणी आरोपीला सात वर्षांची शिक्षा; 5 सप्टेंबरला झाला होता खून

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात श्री विसर्जन मिरवणूक सुरू असताना बहिणीची छेडखानी केल्याच्या वादातून विकी उर्फ ललित हरी मराठे (वय २४, रा. न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) या तरुणाचा आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (वय २०) याने चाकूचे वार करून खून केला होता. ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ९ वाजता ही घटना घडली होती. येथील सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोपी गोलू सावकारे यास ७ वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सोमवारी (दि.५) सुनावली.५ सप्टेंबर २०१७ रोजी न्यू इंडिया सब्जी मंडळ हे मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता न्यू एरियातून श्री विसर्जनासाठी निघाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाजवळ हे मंडळ येताच आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे याने ललित मराठे या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात सावकारेने त्याच्याकडील चाकूने ललितच्या डाव्या बरगडीत वार करून पळ काढला. जखमी ललितचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृत ललितचा आतेभाऊ धीरज मराठे याने पोलिसांत फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास तात्कालिन सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक फौजदार सुनील सोनवणे, प्रवीण ढाके यांनी केला होता.

प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची
सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. या प्रकरणात ११ जणांची साक्षी नोंदवली गेली. त्यात प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी गोलू उर्फ राजेंद्र उर्फ गणेश सुभाष सावकारे यास भादंवि ३०४ ब अंतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा भोगावी लागेल. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रवीण भोंबे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनसिंग राठोड व शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली. या प्रकरणातील मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी मदत केली.

असाही योगायोग
ज्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ललित मराठेची हत्या झाली ती तारीख ५ सप्टेंबर होती. या गुन्ह्यात आरोपीला ५ सप्टेंबर रोजीच शिक्षा सुनावली गेली. शिवाय ५ सप्टेंबरला गोलू सावकारे याचा वाढदिवस देखील होता. या योगायोगाची चर्चा होताना दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...