आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:कार्यकर्ते म्हणतात स्वबळावरच लढा, जिल्हाध्यक्ष म्हणतात वरिष्ठ ठरवतील

रावेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात होणाऱ्या जि.प., पं.स. आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावरच लढाव्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. तर परिस्थिती पाहून रावेर तालुक्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय वरिष्ठांशी बोलून घेऊ, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी बैठकीत दिले.

रावेर बाजार समिती सभागृहात मंगळवारी राष्ट्रवादीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, तर व्यासपीठावर माजी आमदार अरुण पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते. अॅड. पाटील म्हणाले की, निवडणुकीत उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्ते-पदाधिकारी व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू. माजी आमदार अरुण पाटील यांनी कोणावरही अन्याय न होता स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून उमेदवारी द्यावी, असे मत मांडले. ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, दीपक पाटील, रमेश पाटील व माया बारी यांनीही मनोगत व्यक्त केले. इतरही कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढल्यास पक्षाला चांगले यश मिळेल असे मुद्दे जिल्हाध्यक्षांसमोर मांडले.

यावल येथेही सर्व जागांवर उमेदवारीचा आग्रह
येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आगामी जि.प. आणि पं.स.निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. तूर्त इच्छुकांनी तयारी करावी. वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील असे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी सांगितले. बाजार समिती सभागृहात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तर तालुक्याचे निरीक्षक योगेश देसले, अरविंद मानकरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, ईश्वर रहाणे यांनी मार्गदर्शन केले. स्वबळ किंवा आघाडी हा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगण्यात आले. मात्र, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण स्वबळावर लढवले पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी कायम ठेवला. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, एम.बी.तडवी, राकेश कोलते, युवक तालुकाध्यक्ष
ऍड. देवकांत पाटील आदी उपस्थित होते.

भाजपला नामोहरम करण्याची संधी
गेल्या पाच वर्षांपासून रावेर पं.स.मध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात शौचालय योजनेत अर्थिक अपहार उघडकीस आला. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला नामोहरम करण्यासाठी संधी राष्ट्रवादीकडे आहे, असे अटवाड्याचे सरपंच गणेश महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...