आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार:अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींचा कारभार 72 ग्रामसेवकांवर; दोन आहेत निलंबित

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावाच्या विकासाचा पाया असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकच नसल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार केवळ ७२ ग्रामसेवकांवर आहे. तर १० पदे रिक्त आहेत. तालुक्यात ग्राम विकास अधिकाऱ्यांची १० पदे मंजूर आहेत. त्यात ७ कार्यरत आहेत तर ३ पदे रिक्त आहेत.

तालुक्यात ग्रामसेवकांची जवळपास १० पदे रिक्त आहेत. तर २ ग्रामसेवक निलंबित आहेत. त्यामुळे गाव पातळीवर काम करताना तसेच शासनाच्या विविध विकास योजना राबवताना तसेच गावातील राजकारण सांभाळतांना ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागते. अमळनेर तालुक्यात १५३ गावे असून ११९ ग्रामपंचायत कार्यालय आहेत. यात एकूण ८२ ग्रामसेवकांची आवश्यकता असते. परंतु, सद्यःस्थितीत पंचायत समितीकडे ७२ ग्रामसेवक कार्यरत आहेत.

त्यापैकी २ जण निलंबित आहेत. तर १० ग्रामसेवकांकडे इतर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. ८२ ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १० ग्राम विकास अधिकारी आहेत. त्यातही ३ पदे रिक्त असून ७ जण कार्यरत आहेत. १० ग्रामसेवकांकडे अतिरिक्त २ किंवा ३ ग्रामपंचायतीचा कारभार एकत्रितरित्या सांभाळावा लागत असल्याने त्यांची फरपट होत असल्याची खंत ग्रामसेवक व्यक्त करत आहेत. एकाच वेळी २ ते ३ ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळताना नाकीनऊ येते. त्यात शासनाच्या ग्रामसभा, मासिक सभा, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विविध कामांचे दप्तर, अभिलेख तयार करणे, कृषी, महसूल, वन विभाग, आरोग्य, लसीकरण, विविध योजनांची अंमलबजावणी करणे अशी विविध कामे करताना अडचणी येत आहेत.

ग्रामसेवकांची नियुक्ती करु
तालुक्यांतर्गत रिक्त पदांची माहिती प्रशासनास पाठवण्यात येईल. तर अतिरिक्त ग्रामपंचायत कार्यालयास कायम ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात येईल.
एकनाथ चौधरी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

बातम्या आणखी आहेत...