आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ पालिकेची ४६ वर्षांपूर्वी १ ऑक्टोबर १९७६ रोजी हद्दवाढ झाली होती. यानंतर अनेकवेळा प्रस्ताव देऊनही त्यास मंजुरी मिळाली नाही. परिणामी शहरातील जळगाव, जामनेर, वरणगाव, साकरी फाटा परिसर, वांजोळा, शिवपूर कन्हाळे रोड या प्रमुख मार्गावरील मात्र पालिका हद्दीबाहेर राहणाऱ्या सुमारे २८ हजार नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात जामनेर रोड व शिवपूर कन्हाळे मार्गावरील विस्तारीत भागातून शहरात येण्यासाठी चिखल तुडवावा लागतो.
भुसावळ शहराचा गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक विस्तार जामनेर, वांजोळा व जळगाव रोडवर झाला. यापैकी जळगाव रोडवर रस्त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला. पण, जामनेर व वांजोळा रोडवर भागात रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. या भागातून शहरात येण्यासाठी पावसाळ्यात चिखल तुडवण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे होणारी ओरड पाहता काही ठिकाणी रहिवासी स्वखर्चाने किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून मुरूम टाकून घेतात. मात्र, पावसानंतर हा मुरुम वाहून जाताच पुन्हा तीच स्थिती निर्माण होते.
काय आहे अडचण?
पालिका हद्दीत समाविष्ट नसलेला विस्तारीत भाग ग्रामपंचायत किंवा प्रांताधिकाऱ्यांच्या अखत्यारित येतो. पालिका या भागात विकासासाठी निधी देऊ शकत नाही. योजना देखील राबवू शकत नाही. यामुळे केवळ ग्रामपंचायत व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कामे होतात. या भागातील नागरिकांचा रहिवास ग्रामपंचायती हद्दीत असला तरी त्यांचे मतदान मात्र शहरात आहे. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी लक्ष देत नाही.
किमान मुख्य रस्ते तरी करा
रावेर, सावदासारख्या नगरपालिकांची हद्दवाढ होते. मात्र, भुसावळात राजकीय दबाव व इच्छाशक्ती नसल्याने हद्दवाढ रखडली आहे. गेल्या २० ते २२ वर्षांपासून या भागातील नागरिक त्रास सहन करत आहे. विस्तारीत भागात अंतर्गत रस्ते नाहीत, पण किमान मुख्य रस्त्यांचे तरी डांबरीकरण करा.
अॅड.आश्विनी डोलारे, रहिवासी, आरएमएस कॉलनी
हद्दवाढ हाच सक्षम पर्याय
पालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीतही नाही अशा विस्तारीत भागांमध्ये खूप अडचणी आहेत. पालिका हद्द वाढ होण्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. यापूर्वी हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सरकार बदलल्याने तो रेंगाळला होता. आता पुन्हा प्रस्ताव देऊन पाठपुरावा करू. समस्या सोडवू.
संजय सावकारे, आमदार
या विस्तारित भागातील रस्ते सर्वाधिक चिखलमय
जामनेर रोड,श्रद्धानगर, साईनाथ नगर, तुकाराम नगर, हिरानगर, कलानगर, प्रेरणानगर, फुले नगर परिसरातील भाग
वांजोळा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भाग, सैनिक कॉलनी, एमओएच कॉलनी, रुद्राक्षनगर, सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी,शिवपूर कन्हाळे रोड, अमृत नगर, व्हीआयपी कॉलनी, नारायण नगर, रामदेव बाबा कॉलनी, गुलमोहर प्रेट्रीजचा भागात रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.