आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:आठवडाभरानंतर 10 नव्हे, सात दिवसांआड होईल पाणीपुरवठा; पुरवठ्याचा वेळ कमी होणार

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दीड वर्षापासून १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, आता पावसाळ्यात शहराचा जलस्त्रोत असलेली तापी नदी दुथडी भरुन वाहणार असल्याने पाणीपुरवठ्याचा १० दिवसांचा कालावधी कमी करुन ७ दिवसांवर येणार आहे. शहरातील ज्या भागांना पंपिंग यंत्रणा बसवली आहे, तेथे विभाजन व वेळेत कपात करुन हा बदल होईल. त्यासाठी आठवडाभरात सुधारित नियोजन करण्यात येईल. यंदाच्या उन्हाळ्यात रोटेशन चुकल्याने अनेक भागांना १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा झाला. मात्र, भुसावळचा पाणीपुरवठा अवलंबून असलेला तापी नदीतील बंधारा पावसाळ्यात ओसंडून वाहतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन आहे. येत्या आठवडाभरात त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

शहरात असमान पाणी वितरण थांबेल
शहरातील मोठ्या भागांना (झोन) १० ते १२ तास पाणीपुरवठा करावा लागतो. याशिवाय पाइपलाइनच्या शेवटच्या टोकावर पाणी मिळत नाही. म्हणजेच शहरात असमान पाणी वितरण होते. आता व्हॉल्व्हचे योग्य नियोेजन, पंपिंग यंत्रणेत बदल करुन हा पुरवठा चार तासांवर आणण्याचे नियोजन आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशनदेखील पाळता येईल.

गाळाचा धोका... पावसाळ्यात तापी नदीला पूर आल्यास जॅकवेलमध्ये गाळ साचतो. यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेत उचल झालेल्यापैकी सुमारे १० टक्के पाणी गाळाचे वितरण करण्यासाठी वापरले जाते. नेमके याच काळात पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती असते. मात्र, पालिका यंदा चांगल्या गुणवत्तेचे अॅलम वापरुन गाळमिश्रित पाण्यावर प्रक्रिया करणार आहे.

नासाडी थांबणेही गरजेचे
शहरातील आकाराने मोठ्या काही भागांना १० तासांपर्यंत पाणीपुरवठा होतो. पाइपलाइनच्या शेवटच्या टोकावरील भागांना पाणी मिळावे यासाठी हे नियोजन करावे लागते. मात्र, सुरुवातीच्या भागातील नागरिक पाणी भरल्यानंतर नळांना तोट्या लावून बंद करत नाही. यामुळे पाणी वाया जाते, शिवाय पुढील भागांना कमी दाबाने पाणी मिळते. यामुळे नळांना तोट्या बसवणे गरजेचे आहे.

नियोजन सुरू आहे, लवकरच अंमलबजावणी होणार
शहरातील मोठ्या भागांना १० ते १२ तास पाणीपुरवठा करावा लागतो. आता दोन भागांचे विभाजन करुन व त्यांचा वेळ कमी करुन पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. नवीन वेळापत्रक व वेळेची बचत कशी करता येईल? यासंदर्भात नियोजन सुरू आहे. आगामी आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर व सात दिवसांआड पाणी दिले जाईल.
सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पालिका

सध्याच्या योजनेची दुरुस्ती, अमृत योजनेला गती द्यावी
तापीकाठावरील भुसावळकरांना वर्षभर पाण्याची टंचाई सहन करावी लागते. यामुळे पालिकेने जीर्ण झालेल्या सध्याच्या यंत्रणेची नियोजित दुरुस्ती लवकर पूर्ण करावी. तसेच अमृत योजनेला गती देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणीपुरवठ्यातील खंड कमी केल्याचे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना पूर्ण दाबाने, स्वच्छ व पुरेसे पाणी मिळायला हवे.
शिशिर जावळे, आनंद नगर, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...