आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व भूलतज्ञ डॉ.नितीन रामचंद्र पाटील (वय ३६, रा.मोहीतनगर, भुसावळ) हे गुरुवारी सकाळी आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. आज (दि.१७) शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
गुरुवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ते रुग्णालयात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिंग वाजूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी मोहितनगरातील त्यांचे राहते घर गाठले. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी डॉ.पाटील हे बेडखाली मृतावस्थेत पडलेले आढळले. बेडवर तसेच खाली आणि दरवाजात काही सिरिंज आणि औषधी पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी डॉ.पाटील यांच्या घराबाहेर गर्दी केली.
घरी होते एकटेच
डॉ.नितीन पाटील हे सहकुटुंब नुकतेच काश्मीर येथे सहलीसाठी गेले होते. त्यांच्या पत्नी प्रज्ञा पाटील या तीन वर्षीय मुलगी गीतसह पुण्यात माहेरी गेल्या होत्या. तर त्यांचे वडील रामचंद्र पाटील हे हैद्रराबाद येथील मुलाच्या भेटीला गेले होते, अशी माहिती त्यांच्या निकटर्तीयांनी दिली. मृत डॉ.पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य गुरुवारी रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी ट्रॉमा केअर सेंटर येथे शवविच्छेदन केले जाणार आहे. डॉ.पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.
तोंडातून पिवळसर द्रव
डॉ.पाटील यांच्या तोंडातून व नाकातून पिवळसर द्रव बाहेर आलेला होता. तसेच ओठातून रक्त आले होते, असे हॉस्पिटलने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
मिरगीचा होता आजार
डॉ.नितीन पाटील यांना मिरगीचा आजार होता. बुधवारी रात्री शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉ.नीलेश महाजन यांच्याकडे त्यांनी व्हिजीट दिली. रात्री आठ वाजेपर्यंत डॉ.पाटील हे रुग्णालयात होते. मात्र, गुरुवारी ते हॉस्पिटलला न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांचे घर गाठल्यावर घटना उघड झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.