आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आरास, गुलालातून होईल 42 लाखांची उलाढाल ; मध्य प्रदेशातून भुसावळात येतो गुलाल

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मखर, आरास, पुजा विक्रेते सज्ज झाले आहेत. शहरातील मखर व सजावटीच्या वस्तू निर्मिती व विक्रेत्यांना यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे १४ लाख, पुजा साहित्यातून २० लाख व गुलालाच्या विक्रीतून किमान ८ लाख अशी एकूण ४२ लाख रुपयांची उलाढाल होऊ शकेल. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ती यंदा चारपटींनी वाढणार असल्याचा अंदाज आहे. शहरात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मखर व आरासचे साहित्य दिल्ली व मुंबईतून तर गुलाल मुंबई व मध्यप्रदेशातील जबलपूर, इंदूर येथून आणला जातो. मुंबईच्या भगव्या रंगाच्या गुलालाला मंडळांकडून अधिक मागणी असते.

दोन वर्षांपासून कोरेानामुळे गणेशोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले होते, यंदा मात्र भाविक व विक्रेत्यांमध्येही चैतन्य आहे. शहरात मखर, सजावटीच्या साहित्याची निर्मिती करणारे दोन उद्योग आहेत तर ८ ते १० ठोक विक्रेते आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सजावटीच्या साहित्याची निर्मिती केली जात आहे. यंदा सजावट, मखर, फुलांच्या माळा, डिझाईनचे वॉलपेपर आदींच्या विक्रीतून किमान १४ लाख रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. सन २०२० च्या गणेशोत्सवात अत्यल्प तर गेल्या वर्षी ३०० ते ४०० गुलाल गोण्यांची विक्री झाली होती. यंदा मात्र शहरात किमान तीन ते साडेतीन हजार गुलालाच्या गोण्यांची विक्री होण्याचा अंदाज आहे. यातून किमान आठ लाख रुपयांची उलाढाल होईल. तर पुजा साहित्य विक्रीतून २० लाख उलाढालीचा अंदाज आहे.

गुलालातून आठ लाखांची उलाढाल : भगव्या व लाल रंगाच्या गुलालाला मागणी असते. शहरात गुलाल मुंबाईसह मध्यप्रदेशातील इंदूर व जबलपूर येथून आणला जातो.चांगल्या प्रतीचा भगवा व लाल रंगाचा गुलाल १५० ते २५० रुपये गोणी दराने विक्री होतो. तर सर्वसाधारण गुलाबी रंगाचा पारंपारिक गुलाल १०० रुपये गोणीने विक्री होतो. शहरातील सर्व गुलाल विक्रेत्यांच्या माध्यमातून किमान आठ लाख रुपयांची उलाढाल होऊ शकेल अशी माहिती विक्रेते शाम दरगड यांनी दिली.

पूजा साहित्यातून 20 लाख उलाढाल अपेक्षित
शहरात गणेशोत्सवाची पुजेची विक्री करणारे १० ठोक विक्रेते आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांची संख्या ५० आहे. नारळ, हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, कापूर, जानवे, सुपारी, खारिक, पंचरंगी नाडा, पुजेचा लाल कापड आदींच्या विक्रीतून २० लाख रुपयांची उलाढाल होईल. सत्यनारायण पुजेसाठीही पुजा खरेदी केली जाते. घरगुती पुजा १५ ते २० रुपये तर मंडळाची पुजा १०० ते १२५ रुपयांपर्यंत विक्री होते. बहुतांश साहित्य बऱ्हाणपूर, इंदूर व जळगावच्या स्थानिक बाजारातून भुसावळात शहरात येते.

बातम्या आणखी आहेत...