आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ विभागात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे दळणवळण सुविधेचा विस्तार झाला आहे. मात्र, यासोबत अपूर्ण कामे, वाहतूक नियम न पाळणे अशा कारणांमुळे अपघातदेखील वाढले आहेत. भुसावळ पोलिस उपविभागाची हद्द असलेल्या नशिराबादजवळील टीव्ही टॉवर ते दीपनगर या २८ किमी अंतरात जानेवारी २०२२ ते १० डिसेंबर २०२२ पर्यंत २२ अपघात झाले. त्यात २५ जणांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे हे २२ अपघात महामार्गावरील पाच ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी झाले आहेत.
८ डिसेंबरला दीपनगरजवळील एकेरी मार्गावर कार व दुचाकी धडकेत भुसावळातील २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर वाढलेल्या अपघातांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार महामार्गावरील टीव्ही टॉवर (नशिराबादजवळ) ते दीपनगरदरम्यानच वर्षभरात २२ अपघात होऊन २५ मृत्यू झाले. याबाबत तातडीने उपाययोजना करावी, यासाठी डीवायएसपी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देणार आहेत.
दीपनगर उड्डाणपूल जानेवारीअखेर होणार
चौपदरीकरणानंतर महामार्गाचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे वाहन चालवणे असो किंवा रस्ता आेलांडणे प्रत्येकाला नियमांचे पालन करावे लागेल. महामार्गावर रिफ्लेक्टर, दुभाजकांमध्ये संरक्षक जाळ्या, रात्री उजेडासाठी दिवे बसवले आहेत. दीपनगर उड्डाणपुलाचे काम काम जानेवारीअखेर पूर्ण होईल. तर नशिराबाद उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाकडे आहे. शैलेंद्र आवारे, प्रकल्प व्यवस्थापक, महामार्ग विभाग
उपाययोजनांसाठी गेल्या वर्षी दिले पत्र
महामार्गावर वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पाेलिस प्रशासनाने महामार्ग प्राधिकरण विभागाला पत्र दिले हाेते. त्यात महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययाेजना कराव्यात असे नमूद केले हाेते. आता पुन्हा पत्र देऊ. वाहनधारकांनी नियमाचे पालन करावे. साेमनाथ वाघचाैरे, डीवायएसपी, भुसावळ
उपविभागात अपघाती मृत्यूंची संख्या ४८
भुसावळ उपविभागात वर्षभरात एकूण ३३ अपघात झाले आहेत. त्यात तब्बल ४८ जणांना जीव गमवावा लागला. हे अपघात भुसावळ शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पाेलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यापैकी महामार्गाववर झालेल्या अपघातांची संख्या २२ आहे.
वेगमर्यादेची माहिती देणारे फलक नाहीत
महामार्गावर कोणत्या वाहनाची वेगमर्यादा किती आहे? याची माहिती देणारे फलक तुरळक ठिकाणी आहेत. त्यामुळे चौपदरी महामार्ग लागताच सुसाट वेगाने निघणाऱ्या चालकांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन होते. याविरूद्ध कारवाईत सातत्य नाही. महामार्ग पोलिसांची गस्त अपवादानेच होते.
अपघातांची तीन मुख्य कारणे
नशिराबाद व दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलावर केवळ एकरी वाहतुकीची सुविधा आहे. एका बाजूच्या उड्डाणपुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.
साकेगाव व पाटील नर्सरीजवळ महामार्गावर भलेमोठे वळण आहे. या वळणांमुळे अपघात होऊ शकतो, अशा सूचना देणाऱ्या फलकांचा अभाव आहे.
तरसोद फाट्यापुढे फाेर्ड शाेरूम समाेर रस्त्याचे काम सुरू आहे. वेगात असलेल्या वाहन चालकांना याचा अंदाज नसतो. यामुळे अनेकवेळा अपघात होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.