आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग‌ळती:जामनेर रोडवर 450 मीटरच्या अंतरात पाइपलाइनला नऊ ठिकाणी ग‌ळती ; शुद्ध पाणी थेट गटारात वाहून जाते

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहर आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न हे जणू समीकरणच बनले आहे. आताही शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरुन जामनेर रोडवरील किमान ४० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणाऱ्या मेन रायझिंगला अवघ्या ४५० मीटरच्या अंतरात तब्बल ९ ठिकाणी गळती लागली आहे. या गळत्यांमधून हजारो लिटर शुद्ध पाणी थेट गटारात वाहून जाते. दुसरीकडे या पाइपलाइन वरुन पाणीपुरवठा होणाऱ्या ४० हजार लोकसंख्येला कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा त्रास सोसावा लागतो. तापी उशाला असूनही भुसावळला आता बारमाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरासाठी गेल्या आठवड्यापूर्वीच हतनूर धरणातून आवर्तन मिळाले. यामुळे तापीतील पालिकेचा पाणीपुरवठा करणारा बंधारा ओसंडून वाहत आहे, दुसरीकडे मात्र शहरातील पालिकेच्या पाइपलाइनला गळत्यांनी व्यापले आहे. नाहाटा चौफुली जलकुंभावरून जोडणी असलेल्या जामनेर रोडवरील मुख्य लाइनवरून सिंधी कॉलनी, बंब कॉलनी, आनंद नगर, दत्त धाम परिसर, सोनिच्छा वाडी, भवानी पेठ, गंगाराम प्लॉट, गंगावाडी, बद्री प्लॉट, जुने तालुका पोलिस ठाणे, पंचशील नगर, वाल्मीक नगर अशा सुमारे ४० हजार लोकसंख्येच्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. या लाइन वरील नाहाटा चौफुली ते म्युनिसिपल हायस्कूल या अवघ्या ४५० मीटर अंतरात या पाइपलाइनला ९ ठिकाणी गळती लागली आहे. या गळत्यांमुळे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून गटारात वाहून जाते. दुसरीकडे या पाइपलाइन वरुन जोडणी असलेल्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शिवाय गळत्यांमधून अशुद्ध पाणी घराघरात जावून जलजन्य आजारांचा धोका आहे.

या नऊ ठिकाणी गळती... जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली ते म्युनिसिपल पार्क या भागातील हिमालय कंन्स्ट्रक्शन, सिंधी कॉलनी पहिले प्रवेशद्वार, तलाठी कार्यालयाजवळ, राजपूत सॅक्स, मल्हार हॉटेलसमोर, सोनिच्छा वाडी शाळेच्या गेटसमोर, बँक ऑफ बडोदासमोर, साईजीवन सुपर शॉपच्या हॉलजवळ, म्युनिसिपल हायस्कूल समोरील रिक्षा थांबा.

पाण्याचा प्रश्न बारमाही पावसाळा : पावसाळ्यात हतनूरमधून विसर्ग होतो. त्यावेळी गाळाचे प्रमाण वाढल्याने पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा बंद होते. परिणामी अशुद्ध व गाळ मिश्रित पुरवठा होतो. हिवाळा : हिवाळ्यात हतनूर धरणातून आवर्तन न मिळणे. पाइपलाइन फुटण्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. बंधाऱ्यांत विपुल साठा असूनही पाणी मिळत नाही. उन्हाळा : वीजपुरवठ्याचा प्रश्न, यंत्रणेतील बिघाड, वारंवार पाइपलाइन फुटणे यामुळे भुसावळकरांना टँकरद्वारे तहान भागवावी लागते. गळत्यांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

बातम्या आणखी आहेत...