आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च महिन्याच्या सुरूवातीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठला होता. त्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा असल्याने शहर टंचाईच्या उंबरठ्यावर होते. ही स्थिती पाहून पालिकेने पाटबंधारे विभागाकडे हतनूर धरणातून आवर्तनाची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळून सुटलेले आवर्तन बुधवारी सकाळी पोहोचून बंधारा तुडुंब भरला. परिणामी भुसावळकरांची आगामी ४० दिवसांची तहान भागेल. शहराला तापी पात्रातील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यात सुमारे ४० दिवसांचा जलसाठा करता येतो. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून बंधाऱ्याची जल पातळी घसरली. ही स्थिती पाहून पालिकेने हतनूर धरण प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार हतनूर धरणातून ८.९५ दलघमी (१ हजार क्युसेक दररोज) आवर्तन सोडण्यात आले होते.
उन्हाळी हंगामात चार आवर्तन
यंदाच्या उन्हाळी हंगामात हतनूर धरणातून तापी पात्रात ४ आवर्तने सोडण्यात येतील. आता मिळालेले दुसरे आवर्तन आहे. त्यामुळे पावसाळ्या पर्यंत शहरात टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. तरीही नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
पाइपलाइन दुरुस्ती गरजेची
बंधाऱ्यातील जलसाठा वाढल्याने अशुद्ध पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. मात्र, शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी लागलेली गळती अजूनही कायम आहे. यामुळे उन्हाळ्यात शुद्ध पाण्याचा अपव्यय होण्यासोबतच जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी स्थिती आहे.
रेल्वे, दीपनगरला दिलासा
भुसावळ शहरासोबत भुसावळ विभागीय रेल्वे आणि दीपनगर औष्णिक वीजनिर्मीती केंद्राने देखील हतनूरमधून आवर्तनाची मागणी केली होती.त्यामुळे आता सुटलेल्या आवर्तनामुळे पालिकेसोबतच रेल्वे व दीपनगरच्या बंधाऱ्यातही मुबलक साठा राहणार आहे.या दोन्ही विभागांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत.
पाणी चाेरी केल्यास कारवाई
हतनूर धरणातून साेडलेले आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आहे. त्यामुळे कोणीही शेती अथवा उद्योगासाठी माेटरीने नदीपात्रातून पाण्याची चाेरी केल्यास कारवाई होईल. -एस.जी.चौधरी, शाखा अभियंता,हतनूर धरण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.