आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज ग्राहकांनो सावध व्हा:सावधान! वीज बिलासाठी अनोळखी कॉल आल्यास माहिती देऊ नका, फसवणूक होईल

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्ही ऑनलाइन भरलेले वीज बिल कंपनीच्या सिस्टिममध्ये अपडेट झालेले नाही. त्यामुळे तुमच्याकडे बिल थकीत दिसत आहे. ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक’ अशी माहिती देणारा कोणताही कॉल आला तर वीज ग्राहकांनो सावध व्हा. कारण, अशा कॉलला प्रतिसाद देणे तुम्हाला चुना लावणारे म्हणजेच तुमचे बँक खाते रिकामे करण्याचे कारण ठरू शकते. कंडारी भागातील रहिवासी आयुध निर्माणीच्या निवृत्त कर्मचाऱ्याला याच पद्धतीने एका भामट्याने तब्बल दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कंडारी (ता.भुसावळ) येथील महादेव टेकडी भागातील रहिवासी निवृत्त कर्मचारी सुरेश तुळशीराम जोनवाल यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी ९.३० वाजता ऑनलाइन वीज बिल भरले. यानंतर काही वेळाने त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्याने मी वीज कंपनीच्या कार्यालयातून बोलत आहे. तुम्ही ऑनलाइन भरलेले वीज बिल कंपनीच्या सिस्टिममध्ये अपडेट झाले झालेले नाही. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही बील थकीत दिसत आहे. तुम्ही भरलेले बिल अपडेट हाेण्यासाठी दहा रूपये पुन्हा पाठवा. यानंतर तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल. त्यावर क्लिक करा. यानंतर काही वेळातच तुमचे बील अपडेट हाेईल, अशी बतावणी केली. यानंतर फोनवरील भामट्याने जोनवाल यांना लिंक पाठवली. त्यावर जोनवाल क्लिक केले. मात्र, पलीकडील भामट्याने पुन्हा अद्यापही तुमचे बिल अपडेट होत नाही.

तुम्ही एचडीएफसीचा पीन टाका असे सांगितले. तरीही उपयोग होत नसल्याचे सांगत भामट्याने एसबीआय बँक खात्याचा पिन टाकण्याची सूचना केली. एसबीआयचा पीन नंबर टाकताच पलीकडील व्यक्तीने तुम्ही भरलेल्या वीज बिलाची रक्कम आता अपडेट झाल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच दोन्ही खात्यातून १ लाख ४८ हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाल्याने त्यांनी कपाळाला हात मारून घेतला.

दाेन्ही खात्यातून काढले पैसे
भामट्याला बँकेचा पीन क्रमांक देताच जोनवाल यांच्या मोबाइलवर दोन्ही बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे मेसेज आले. त्यांच्या खात्यातून १ लाख ४९ हजार रूपये डेबिट झाले हाेते. ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचे लक्षात येताच जोनवाल त्यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिराने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक गजानन पडघन तपास करत आहे.

लिंकला प्रतिसाद देऊ नका
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार पाहता कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा मोबाइलवर अनोळखी नंबरवरून विचारलेली माहिती देऊ नका. विशेष म्हणजे एटीएम, मोबाइलचा पिनकोड कोणालाही सांगू नये. अनेकवेळा फसवणूक करणारे तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, या बहाण्याने वेगवेगळी माहिती विचारतात. फसगत करणाऱ्या लिंक पाठवतात. त्यास प्रतिसाद देऊ नये. अन्यथा फसवणूक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

धोका ओळखा आमिषाला बळी पडू नका
फेक नंबरवरून कॉल करून भामटे वेगवेगळी आमिषे देतात. अशा कोणत्याही आमिषाला बळी पडून बँक खाते, एटीएम किंवा माहिती अनोळखीला देऊ नका. त्यामुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी ऑनलाइन
फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
साेमनाथ वाघचाैरे, डीवायएसपी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...