आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील स्वामी विवेकानंद नगरातील दीपक जगदीश शिंपी (वय १२) आणि गणेश नीळकंठ दुसाने (वय १४) या दोघांचा पाटचारीत बुडून मृत्यू झाला. यापैकी दीपक हा ज्योती शिंपी यांचा एकुलता एक मुलगा होता. तो आठ महिन्यांचा असताना कौटुंबिक कलहामुळे ज्योती त्याला घेऊन माहेरी आई-वडिलांकडे आल्या. शेतमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, बहीण ज्योतीच्या आयुष्याचे मातेरे होऊ नये म्हणून भावांनी त्यांना दुसरे लग्न करावे, अशी विनंती केली. जी व्यक्ती माझ्यासह मुलाला स्वीकारेल, त्याच्यासोबत मी लग्न करेल या अटीवर त्या तयार झाल्या. त्यात बारा वर्षे सरली. दरम्यान, दुसरा संसार थाटल्यास लेकरावर अन्याय होईल म्हणून ज्योतीने हा विषय मागे सारला. मुलगा दीपकला आधार मानून त्या त्याच्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत होत्या. मात्र, दीपकचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांची सर्व स्वप्ने अंध:कारमय झाली.
दीपक शिंपी आणि गणेश दुसाने हे दोघे बुधवारी दुपारी पाटचारीत बुडाले होते. त्यामुळे रात्री थांबवलेली शोधमोहीम गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात गयकाटे हनुमान मंदिराजवळ दोघांचे मृतदेह सापडताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या दोघांना शोधण्यासाठी परिसरातील नगरसेवक अभिमन्यू चौधरी, गणेश महाजन, समीर मोमीन, कांतिलाल कोळी, भरत कोळी, अमोल दुसाने, बापू कोळी, प्रकाश कोळी, देवानंद कोळी, प्रतीक येवले, विपुल येवले, सागर बारी, राहुल भालेराव आदींनी परिश्रम घेतले. यानंतर मृतदेह पाटचारीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉ.बी.बी.बारेला, डॉ. शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले. यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास अंत्यविधी झाली. तपास उपनिरीक्षक अजमल खान पठाण, हवालदार नितीन चव्हाण करीत आहे.
दोघांची अंत्ययात्रा सोबत
सुदर्शन चौकातून दुपारी अडीच वाजता दीपक आणि गणेशची अंत्ययात्रा सोबतच निघाली. महर्षी व्यास मंदिरामागील हिंदू दफनभूमीत दोघांचा एकमेकांशेजारी दफनविधी झाला. स्वामी विवेकानंद नगरातील सरस्वती विद्या मंदिर परिसरात एकाही घरात चूल पेटली नाही.
संपूर्ण रात्र काढली जागून
दीपक व गणेश पाटचारीत बुडून बेपत्ता झाल्याचे बुधवारी रात्री समोर आले. यानंतर परिसरातील रहिवाशांनी संपूर्ण रात्र जागून काढली. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी मृतदेह शोधण्यासाठी परिसरातील नगरसेवकांसह इतर तरुणांनी मदत केली.
कपारीत अडकले मृतदेह
ही दुर्घटना झाली त्या पाटचारीला काही ठिकाणी कपार पडली आहे. गयकाटे हनुमान मंदिराजवळ पाटचारीच्या या कपारीमध्ये सकाळी १० वाजता आधी दीपकचा, तर तेथून सुमारे १५ फूट अंतरावर १०.४५ वाजता गणेश दुसाने याचा मृतदेह पोहणाऱ्यांना सापडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.