आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे शिरजोर:मॉडर्न रोडवरील तीन मॉल फोडले, रोकड, कपड्यांसह 9 लाखांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरेकृष्ण, गोपी मॉल, गुरूनानक स्टोअर्समध्ये पत्रे उचकवून प्रवेश

गांजा तस्करी, गावठी पिस्तूल प्रकरणामुळे भुसावळातील गुन्हेगारी चर्चेत आहे. त्यात आता शहरातील मॉडर्न रोडवरील एकाच रांगेत जवळजवळ असलेल्या हरे कृष्णा मॉल, गुरूनानक क्लाॅथ स्टाेअर्स व गाेपी सुपर शॉपिंग मॉल या तीन मोठ्या दुकानांमध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी झाल्याने खळबळ उडाली. दोन चोरट्यांनी वरील बाजूचे लोखंडी पत्रे उचकावून आत दुकानात प्रवेश केला. बाहेरून गेटला कुलूप असल्याने कुणालाही संशय आला नाही. यामुळे ३ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे ५ लाख रुपये किमतीचे रेडिमेड कपडे असा सुमारे ९ लाख रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे सहजपणे पसार झाले.

फुटेजनुसार तपास सुरू
हरेकृष्ण मॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत. त्यात संशयिताचा चेहरा देखील दिसत आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे. लकवरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील.

शहरातील मुख्य मार्ग अशी ओळख असलेल्या मॉडर्न रोडवरील कपड्यांच्या दुकानांना दोन चोरट्यांनी लक्ष्य केले. सोमवारी मध्यरात्री नंतरची ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे मॉडर्न रोडवरील व्यापारी वर्गात कमालीची खळबळ उडाली, तर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, चोरीची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी कुणाल साेनवणे, पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली.

त्यात तिन्ही दुकानांच्या वरील बाजूचे पत्रे उचकावून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याची मोडस ऑपरेंडी समोर आली. तसेच ज्या दुकानांमध्ये चोरी झाली त्यापैकी हरे कृष्ण मॉल व गुरू नानक क्लॉथ स्टोअर्स मधील सीसीटीव्ही कॅमेरे रात्री बंद ठेवले होते, असे समोर आले. मात्र, हरे कृष्ण मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोराच्या हालचाली चित्रित झाल्या. दरम्यान, चोरट्यांनी तिन्ही दुकानात साहित्याची फेकाफेक करून ड्रॉवरमधील रोख रक्कम लांबवली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरू नानक क्लॉथ स्टोअर्समधून १ लाख ७५ हजार, हरेकृष्णा माॅलमधून ४५ हजार व गाेपी सुपर शॉपिंग माॅलमधून १ लाख ५८ हजार अशी एकूण ३ लाख ८० हजार रुपयांची राेकड काही मिनिटांतच चोरीला गेली.

गाेपी सुपर मॉलला माेठाच फटका : गाेपी सुपर शॉपिंग माॅलमध्येही चोरट्यांनी वरील मजल्यावरील शटर ताेडून आत प्रवेश केला. नंतर १ लाख ५८ हजार रुपयांची रोकड लांबवली. याच दुकानातून चोरट्यांनी महागडे रेडिमेड कपडे सुद्धा चाेरून नेले. सुमारे ३ लाख रूपये किमतीचे हे कपडे आहेत. त्यात रेडीमेड पॅँट, शर्ट, टी-शर्ट, काेट, सूटचा समावेश आहे.

हरेकृष्ण मॉलमध्ये चार मिनिट चाेरटा : छताच्या बाजूची पत्रे उचकावून चोरट्यांनी मॉडर्न रोडवरील हरे कृष्ण मॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर पुढील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. त्यात चाेरट्याने रात्री १२.५२ वाजता गल्ल्याचा ताबा घेतला. तो चार मिनिटे म्हणजेच १२.५६ पर्यंत तेथे हाेता. यादरम्यान त्याने गल्ल्यातील ४५ हजारांची राेकड व अन्य साहित्य लांबवले. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

गुरूनानक स्टाेअर्समध्ये रक्कम लांबवली : चाेरट्यांनी या मार्गावर असलेल्या गुरू नानक क्लाॅथ स्टाेअर्समध्ये देखील वरील बाजूनेच प्रवेश केला. नंतर दुकानातील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लांबवली. येथील कपड्यांना मात्र हात लावला नाही. केवळ रक्कम घेऊन काढता पाय घेतला. शटरला बाहेरील बाजूने कुलूप असल्याने कुणालाही आतील चोरट्यांचा अंदाज आला नाही.

1 व्यावसायिकांनी रात्री दुकाने बंद करताना तेथे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवू नये. ही रक्कम घरी अथवा सोयीच्या ठिकाणी सुरक्षितपणे ठेवावी. 2 दुकानातील प्रत्येक हालचाल टिपली जावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. रात्री दुकान बंद करताना कुलूप व्यवस्थित लागल्याची खात्री करावी. - राहूल गायकवाड, पोलिस निरीक्षक, बाजारपेठ 3 रात्रीच्या वेळी देखील दुकानात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावे. त्यामुळे अप्रिय घटना झाल्यास चोरट्यांचा माग काढणे सोयीचे होईल.

बातम्या आणखी आहेत...