आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील बंधाऱ्याची जलपातळी सुमारे १० इंचाने खालावली आहे. २० डिसेंबरला हतनूर धरणातून अतिरिक्त आवक झालेल्या ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला होता. यामुळे तापीतील अपर बंधाऱ्यात ८ इंच, तर निम्न बंधाऱ्याची जलपातळी ६ इंचाने वाढली होती. हा वाढीव जलसाठा आता तळ गाठत आहे. सध्या शहराला केवळ १२ दिवस पुरेल इतकाच साठा बंधाऱ्यात शिल्लक आहे. यामुळे आगामी पंधरवड्यात हतनूरमधून आवर्तन न मिळाल्यास शहरावर पाणी कपातीची वेळ येईल.
तापी पात्रातील रेल्वे व पालिकच्या बंधाऱ्याची पातळी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात घटली होती. यामुळे रोटेशन पुढे ढकलावे लागले होते. मात्र, सुदैवाने हतनूर धरणात डिसेंबर अखेरपर्यंत पाण्याची आवक कायम होती. या अतिरिक्त आवकमधून २० डिसेंबर रोजी हतनूर धरणातून ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाऱ्यातील पातळी ६ इंचांनी वाढली होती. त्यात आता पुन्हा घसरण झाली आहे.
हतनूर धरणामध्ये मुबलक साठा रब्बीचे पहिले आवर्तन देवूनही हतनूर धरणात सध्या ९८ टक्के साठा आहे. त्यामुळे पालिकेने आवर्तनाची मागणी केल्यानंतर आवर्तन मिळू शकेल. पण, यासाठी पालिकेने नियोजन करुन वेळेवर आवर्तन मिळावे यासाठी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. तसेच असे पत्र मिळताच पाटबंधारे विभागाने निर्णय घेऊन नदीत आवर्तन सोडणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात गळती दुरुस्ती करा पालिकेने गतवर्षी शहरातील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली. यामुळे गळती थांबली. पण, अंतर्गत भागात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती आहे. त्यातून होणारी नासाडी रोखण्यासाठी शहरात सर्वत्र गळत्यांचे सर्वेक्षण करावे. हिवाळ्यात दुरुस्ती पूर्ण करावी. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहरात पूर्ण दाबाने व शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होईल.
बंधाऱ्याची स्वच्छता, उंची वाढावी तापी बंधाऱ्यातील साठा संपण्यापूर्वी हतनूर धरणातून पहिले आवर्तन मिळू शकते. त्यामुळे टंचाईची शक्यता धूसर आहे. दरम्यान, पालिकेच्या तापीतील बंधाऱ्यात केवळ ३० दिवसांचा साठा होतो. यामुळे बंधाऱ्याची उंची वाढवणे, गाळ काढून स्वच्छता करणे, उत्तरेकडील वापरात न येणाऱ्या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.