आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृत योजनेचे काम रखडले असले तरी तीन दिलासादायक बाबींमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आगामी काळात सुटणार आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन, जलवाहिन्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती व हतनूर धरणासह पालिकेच्या तापीतील बंधाऱ्यात असलेला मुबलक साठा अशी ही कारणे आहेत. यामुळे केवळ हिवाळा, उन्हाळाच नव्हे तर थेट पावसाळ्यापर्यंत टंचाई जाणवणार नाही. विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होताच मार्च २०२३ नंतर शहरात ८ ऐवजी ६ दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे नियोजन होत आहे.
दिलासा देणाऱ्या तीन बाबी
पाणीपुरवठा योजनेवरील सन १९५८ मधील जीर्ण यंत्रणेची दुरुस्ती सुरू आहे. साडेपाच कोटी रुपये निधीतून होणारे हे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल. ड्रेनेज, सॅण्ड फिल्टर, क्लोरिफाक्युरेटर, सर्व पंपिंग यंत्रणा, नवीन व्हॉल्व्ह, चेंबर, सेटलिंग टँक या कामांमुळे शुद्ध पाणी मिळेल.
पालिकेने शहरातील गळती लागलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती हाती घेतली आहे. मेन रायझिंगसह अंतर्गत भागातील गळती रोखली जाईल. यामुळे शुद्ध झालेले पाणी वितरणादरम्यान अशुद्ध होणे व अपव्यय थांबेल. गळती दुरुस्तीमुळे नागरिकांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल.
यंदा हतनूर धरणात मुबलक साठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधारा तुडुंब आहे. हा साठा जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत टिकेल. नंतरही हतनूरमधून मागणीनुसार पाणी मिळेल.
जलशुद्धीकरण गतीने होईल
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक गतीने होईल. यामुळे साधारण मार्च महिन्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे रोटेशन दोन दिवसांनी कमी होऊ शकते. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका भुसावळ या जलशुद्धीकरण यंत्रणेची दुरुस्ती होत आहे.
अमृत योजनेपर्यंत दिलासा
शहरात ४२.७६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या अमृत योजनेचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ९० टक्के कामे पूर्ण झाली. उर्वरित कामांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करुन त्यांना गती दिली जाईल. अमृत योजना पूर्णत्वास येईपर्यंत सध्याच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराची तहान भागवली जावी, या हेतूने जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन व जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.