आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:भाजप-शिवसेना तळवेलला भिडणार, 6 ग्रा.पं.मध्ये 10 जण अविरोध सदस्य

भुसावळ/वरणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघारीनंतर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यात तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या आणि राजकीय प्रभाव असलेल्या १३ सदस्यीय तळवेल ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी भाजपसमोर शिवसेनेचे (ठाकरे गट) आव्हान असेल. याशिवाय इतरही दोन सदस्य रिंगणात आहेत. तर १३ सदस्यांसाठी ३० उमेदवार आहेत. दरम्यान, बुधवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी ६ ग्रा.पं.मध्ये १० सदस्यांची बिनविरोध निवड झाली. आता १४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात ओझरखेडा, कन्हाळे बुद्रुक, कन्हाळे खुर्द, तळवेल, पिंपळगाव खुर्द व मोंढाळे येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी ८ जणांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार आहेत. तर सर्व सहा ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदाचे १४४ अर्ज होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतली. आता ११४ उमेदवार आखाड्यात आहे. दरम्यान, तळवेल येथे लाेकनियुक्त सरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहे. त्यात भाजप व शिवसेना (ठाकरे) उमेदवारात लढत आहे. येथील सरपंचपद एससी महिलेसाठी राखीव आहे. शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार विद्या भारसके, भाजपच्या संगीता सुरवाडे, तर अनिता वानखेडे, विजया सुरवाडे देखील स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.

महिलांमधील चौरंगी लढतीची उत्सुकता आहे. तहसीलदार दीपक धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शोभा घुले, निवडणूक शाखेचे भगवान सिरसाठ, निवडणूक निर्णय अधिकारी वाय.वाय.पाटील, आर.एस.तायडे, डी.आर.जयंकार, के.पी.काळे, एस.डी.पाटील, एफ.एस.खान काम पहात आहे. यापुढील टप्प्यात १८ डिसेंबरला मतदान, तर २०ला मतमोजणी होईल. दरम्यान, माघारीनंतर तालुकास्तरावरील वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवडणुकीत लक्ष घालायला सुरूवात केली आहे.

असे आहेत उमेदवार... कन्हाळे खुर्द सरपंचपद ३ व सदस्य पदाचे १०, ओझरखेडा सरपंचपद ५ व सदस्यांसाठी १६, कन्हाळे बुद्रूक सरपंचपद ५ व सदस्यपदाचे १९, तळवेल सरपंचपद ४ व सदस्यपद ३०, मोंढाळा सरपंच २ व सदस्य पदाचे १२, पिंपळगाव खुर्द सरपंच ४ व सदस्य पदाचे २७ उमेदवार आहेत. या सर्व ठिकाणी ऐन हिवाळ्यात राजकारण तापणार आहे.

कुठे मनधरणी, तर कुठे विनवण्या अर्ज माघारी घेण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मनधरणीचे प्रकार तहसीलमध्ये सुरू होते. या सर्व प्रयत्नांअंती सदस्य पदासाठी कन्हाळे खुर्द १, ओझरखेडा ४, कन्हाळे बुद्रूक १०, तळवेल १, मोंढाळा १, पिंपळगाव खुर्द ३ अशा २० जणांनी माघार घेतली. यामुळे कन्हाळे खुर्द २, ओझरखेडा २, कन्हाळे बुद्रूक ३, मोंढाळा ३ असे एकूण १० सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...