आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय भोळे दूध संघात प्रशासक:पालिका निवडणुकीच्या तोंडावर भुसावळात खडसेंना शह देण्याची भाजपची खेळी

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राज्य सरकारने प्रशासक मंडळ नेमले. या प्रशासकांमध्ये दिग्गजांचा समावेश आहे. मात्र, भाजपने भुसावळ तालुक्यातून पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश चिटणीस अजय भोळे यांना अनपेक्षित संधी देऊन एकाचवेळी अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

भुसावळ भाजपचा चेहरा असलेले तत्कालिन नगरसेवक अजय भोळे सुमारे सहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात काहीसे बाजूला पडले होते. सन २०१६ च्या पंचवार्षिक काळात अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने तात्कालिन राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार युवराज लोणारींना पाठिंबा दिला होता. यावेळी नगरसेवक अजय भोळे यांनी भाजपचा व्हीप झुगारुन तटस्थ राहणे पसंत केल्यावर पक्षाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती. यानंतर भोळे पक्ष संघटनेत सक्रिय असले तरी पालिका व शहर भाजपमध्ये विजनवासात गेले होते. मात्र, भाजपमध्ये खडसे व महाजन अशी उघड दुफळी होताच भोळे महाजनांच्या गोटात गेले. यानंतर स्थानिक पक्ष संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढला. पालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता पक्षाने त्यांची दूध संघावर प्रशासक पदी वर्णी लावली. यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या.

अपात्रता प्रकरणानंतर भाजपची खेळी भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणारे खडसे समर्थक लोकनियुक्त नगराध्यक्ष व ९ नगरसेवक अशा एकूण १० जणांवर नुकतीच पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई झाली. या १० पैकी ८ नगरसेवक लेवापाटीदार समाजाचे आहेत. आता अजय भोळेंच्या माध्यमातून भाजपने एकनिष्ठ कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल, असा राजकीय व सामाजिक मेसेज दिल्याचे निरीक्षण आहे.

पालिका निवडणूक डोळ्यासमोर
आगामी पालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पद्धतीने होणार आहे. शहराचा विचार करता लेवा पाटीदार समाज निर्णायक असून भाजपची हक्काची मतपेटी समजला जातो. मात्र, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर हे चित्र काहीसे अस्थिर झाले. त्यानंतर भाजपने भुसावळ शहराध्यक्षपदी परीक्षित बऱ्हाटे आणि आता दूध संघात प्रशासक म्हणून अजय भोळेंना संधी देऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...