आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नागपूर येथे, ६ जूनला भुसावळ व नागपूर विभागातील खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. विभागातील रेल्वेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची गैरहजेरी होती. त्यामुळे विभागातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर आलेच नाहीत. नागपूर येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ठराव सभागृहात ही बैठक झाली होती. प्रवाशांच्या सुविधा आणि बोर्डावरील प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थित खासदारांचे स्वागत केले. मध्य रेल्वेने भुसावळ आणि नागपूर विभागात गेल्या काही महिन्यांत केलेल्या विकासकामांची यावेळी माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून खासदारांना दिली. बैठकीत नागपूर, भुसावळ येथील डीआरएम, उपमहाव्यवस्थापक (मुंबई), प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, मुख्य अभियंता, मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, प्रधान मुख्य अभियंता, प्रधान मुख्य विद्युत अभियंता उपस्थित होते.
बैठकीत धुळे येथील खासदार सुभाष भामरे यांनी मालेगाव रोडवरील गेट क्र. २२ येथे आरआेबी बांधून धुळे ते मुंबई १८ डब्यांची ट्रेन सुरू करण्याची सूचना केली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नागपूर भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस (२२११२) पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३७) आणि संघमित्रा एक्स्प्रेस (१२२९६) यांचा पांढुर्णा स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. उपस्थित सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघातील प्रवासी सुविधांशी संबंधित सूचना मांडल्या. मात्र, भुसावळ विभागाच्या समस्या बैठकीत मांडल्याच गेल्या नाहीत.
खासदारांकडून प्रतिसाद नाही... ‘दिव्य मराठी’ने खासदार रक्षा खडसे आणि खासदार उन्मेश पाटील यांची अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र दाेन्ही खासदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.