आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बकालेंच्या अटकेसाठी 10 पासून साखळी उपाेषण ; सर्व जाती, धर्म, संघटनांचा सहभाग

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निलंबित व गुन्हा दाखल असलेले एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी साेमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत साखळी उपाेषण करण्यात येणार आहे. या उपाेषणात सर्व जाती, धर्म, संघटना सहभागी हाेणार आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाने बकालेस अटक न केल्यास पुढे सनदशीर मार्गाने समाजाकडून ठोक आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने पाेलिस प्रशासनासाेबत झालेल्या बैठकीत दिला. अ. भा. छावा मराठा युवा संघटना, मराठा सेवा संघ यासह सकल मराठा समाजातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी व पाेलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यात निलंबित पोलिस निरीक्षक बकालेंना अटक करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही त्यांना जाणूनबुजून अटक केली जात नाही. त्यामुळे सर्व जाती, धर्माच्या विविध संघटना या १० ऑक्टाेबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास बसणार आहेत, असे म्हटले आहे. पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांच्याशी झालेल्या बैठकीस प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, डाॅ. संभाजी देसाई, भीमराव मराठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यांचा सहभाग : छावा मराठा युवा संघटना, मराठा सेवा संघ, मराठा प्रिमियर लिग, लोकसंघर्ष मोर्चा, मराठा उद्याेजक विकास मंडळ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, ग. स. सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळ परिवार, बुलुंद छावा संघटना, अ. भा. युवा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी सेना, संभाजी ब्रिगेड राजकीय, नारीशक्ती संस्था, कंजरभाट समाज मंडळ, नवयुवक मराठा मंडळ, छत्रपती शिवाजी राजे संस्था, लेवा महासंघ, धनगर समाज महासंघ, समता विकास परिषद, जनक्रांती मोर्चा, मनियार बिरादरी, खान्देश माळी महासंघ, मौलाना आझाद विचार मंच, अ. भा. मराठा महामंडळ, बामसेफ, छावा मराठा युवा महासंघ, ज्येष्ठ नागरिक संघ, कादरी फाउंडेशन, आधार ज्येष्ठ नागरिक संघ उपाेषणात सहभागी हाेणार आहेत. या संघटना ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या संख्येनुसार उपाेषण करणार असल्याचे हिरामण चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...