आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:रावेरला पाणीपुरवठ्यावर लाखो रुपये खर्च होऊनही नागरिक त्रस्त ; पालिकेने ठेकेदार नियुक्त केला

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पालिकेतर्फे शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व कर्मचाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शहरात पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार बदलून दुसऱ्याला काम द्यावे, अशी मागणी अष्टविनायक नगरातील नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या विविध विभागातील कामे करण्यासाठी रोजंदारीवर मजूर पुरवण्याचा ठेका पालिकेने दीपक मनवाणी यांना दिला आहे. शहरातील व हद्दवाढीमुळे नव्याने पालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या भागात पाणीपुरवठ्यासाठी मनवाणी मजूर पुरवतात. मात्र, पाणीपुरवठा करणारे मजूर मनमानी पद्धतीने काम करतात. त्याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरातील जुन्या भागात एक दिवसाआड, तर नव्याने समाविष्ट झालेल्या भागात कधी चौथ्या, तर कधी पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. शहरात सर्वत्र समान पद्धतीने शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्याची जबाबदारी पालिकेची आहे. मात्र, पाणीपुरवठा कर्मचारी त्यांना वाटेल तेव्हा पाणीपुरवठा करतात. त्यात कॉलनी भागात रात्री दीड दोन वाजता होणारा पाणीपुरवठा झोपमोड करणारा ठरतो. अनेकवेळा पाण्याची टाकी रिकामी असताना पाणीपुरवठा सुरु केला जातो. त्यामुळे नळांना पाणी येत नाही. एकाच वेळी दोन ते तीन व्हॉल्व्ह सुरु केले जातात, त्यामुळे तासभर मोटार चालवूनही थेंबभर पाणी मिळत नाही. दरम्यान, ही समस्या सोडवण्यासाठी पाणीपुरवठ्याची वेळ अर्ध्या तासाने वाढवावी, अशी मागणी अष्टविनायक नगरातील शरद राजपूत यांनी केली. अल्प मोबदल्याची तक्रार पाणीपुरवठा करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाचा योग्य मोबदला मिळत नाही, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे केली आहे. महिन्याला ठेकेदाराकडून केवळ ६५०० रुपये दिले जातात. रावेर ग्रामीणमध्ये ४८ व्हॉल्व्ह असून ते सुरु-बंद करण्यासाठी फिरावे लागते. त्यातील ३००० रूपये वाहनावर खर्च होतात. त्यामुळे मोबदल्यात वाढ करावी अन्यथा ४ जूनपासून काम बंद करण्याचा इशारा कल्पेश सोनार व विशाल शिंदे या रोजंदारीवरील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पालिकेला दिला आहे. त्यामुळे पालिका दखल घेते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...