आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटवडा:कोळसा साठा घसरला; एक संच पुन्हा बंद होण्याची भीती, दीपनगर केंद्रातून राज्याला 680 मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण-उत्सवात राज्यातील विजेची मागणी वाढल्याने दीपनगर केंद्रातून निर्मिती वाढवण्यासाठी ५०० मेगावॅटचे दोन्ही संच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे कोळशाचा साठा २९ हजार टनवरून २० हजार ४०१ टनांपर्यंत घसरला आहे. मात्र, अशाही स्थितीत दीपनगर केंद्रातून राज्याला ६८० मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू आहे. एकच दिवसाचा कोळसा साठा शिल्लक असल्याने दैनंदिन पुरवठा रखडल्यास एक संच बंद होऊ शकतो.

दीपनगरातील कोळसा साठा घसरल्याने ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ बंद केला होता. यानंतर महानिर्मिती प्रशासनाने कोळशाचा साठा वाढवला. परिणामी सोमवारी (दि. ४) २९ हजार टन कोळसा साठा झाल्याने हा संच पुन्हा सुरू करण्यात आला. यामुळे वापर वाढल्याने केंद्रात सध्या २० हजार ४०१ टन कोळसा शिल्लक आहे. शनिवारी दुपारपर्यंत केवळ एक रॅक कोळसा प्राप्त झाला. अशा बिकट स्थितीत दीपनगर केंद्रातून विजेची निर्मिती सुरू आहे. मात्र, दोन दिवस चार ते पाचऐवजी एक किंवा दोनच रॅक कोळसा मिळाल्यास शिल्लक साठ्यातून कोळसा वापरला जाईल. यामुळे प्रशासनाला पुन्हा ५०० मेगावॅटच्या दोनपैकी एक संच बंद करावा लागू शकतो. दरम्यान, राज्यात ऑक्टोबर हीट व सण-उत्सवांमुळे विजेची मागणी वाढली आहे. शनिवारी दुपारी ही मागणी २० हजार ६३७ मेगावॅट होती. या तुलनेत निर्मिती केवळ १३ हजार ५०२ मेगावॅट होती.

दररोज १७ हजार टन कोळशाची गरज
दीपनगर केंद्रातील ५०० मेगावॅटचे दोन्ही संच कार्यान्वित ठेवण्यासाठी दररोज १७ हजार टन कोळशाची गरज भासते. दररोज रेल्वे रॅकद्वारे कोळसा मिळत आहे. मात्र, दररोज कोळसा उपलब्धतेचे प्रमाण कमी झाल्यास अडचणी येतील. या अडचणी येऊ नयेत यासाठी साठा वाढवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

बातम्या आणखी आहेत...