आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा तालुक्यातील सातपुड्यात कंपार्टमेंट क्र. १९३ ते १९७ दरम्यान १० हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनहद्दीतील पाचही मातीची धरणे, २० सिमेंट बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तहान भागवण्यासाठी वन्यजीवांना २० ते २५ किमी अंतर पार करून बागायती शेतशिवाराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष होण्याची भीती व्यक्त होत आहे. जंगलातील १० हजार हेक्टर क्षेत्रात कुठेही कृत्रिण पाणवठा नाही. सातपुड्यात खर्डी गावापासून चार किमी अंतरावर डुकरणे १, डुकरणे २, कुंड्यापाणी, धुपामाय ही चार मातीची लहान धरणे बांधण्यात आली आहेत. अडावदपासून सहा किमी अंतरावर कुसुमदरा येथेही धरण आहे. त्यात गाळ साचल्यामुळे समाधानकारक पाणीसाठा पावसाळ्यात झाला नाही. परिणामी वन्यजीवांसाठी एकमेव आशा असलेली ही धरणे यंदा कोरडीठाक झाली आहेत. अडावद, धानोरासह बिडगाव शेतशिवारात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे अडावदच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. मात्र त्यात वनतळे व धरणे आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. वनहद्दीतील कुसुमदरा येथील एक व डुकरणेतील तीन अशी चार घरणे गाळाने भरली आहेत. त्यांच्यात ५० टक्के गाळ आहे. गाळ काढला, तर पुढील वर्षी तरी प्राण्यांची पाण्याची सोय होईल.
कर्मचाऱ्यांना पाणी मिळेना
सातपुडा पर्वतात रोज कृत्रिम वणवा लागत आहे. त्यामुळे आग विझविण्यासाठी जाणारे वनमजूर आणि वनकर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तापमानाचा पारा वाढत असताना आग विझवणे अत्यंत जिकरीचे काम असते. तरी कर्मचाऱ्यांना १० ते १२ किमी पायपीट करून वाहनतळापर्यंत पाण्यासाठी यावे लागते.
गावांशेजारी प्राणी दर्शन
सातपुड्यात सुमारे २० हजार हेक्टर वनक्षेत्रात अधिवास असलेले बिबटे, तडस, लांडगे, माकडांसह अन्य पशु-पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी किमान १० किलोमीटर अंतरावरील बागायती शेतीशिवाराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे अडावद, खर्डी, वर्डी, धानोरा या गावांच्या शेजारी वन्यप्राणी दिसू लागले आहेत.
पाणवठे तयार करू... सिमेंटचे बंधारे आटले
अडावद वनक्षेत्रात वनतळे नाहीत. सिमेंट बंधारे बांधले आहेत, मात्र त्यात पाणी नाही. साग्यादेव व गांधारपाडा परिसरात नैसर्गिक पाणवठे आहेत. पंरतू ते अडावदपासून ३० ते ३५ किमीवर आहे. असे असले तरी बंधारे बांधण्याला व कृत्रिम पाणवठे तयार करण्याला वनविभागाचे प्राधान्य राहील. - आनंदा पाटील, वनक्षेत्रपाल, अडावद परिक्षेत्र
वनविभागाने लक्ष द्यावे... जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष
अडावदपासून उत्तरेकडील सातपुड्याच्या पर्वतरांगात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. जंगलात २० ते २५ किलोमीटर अंतरापर्यंत शोधूनही पाण्याचा थेंब मिळत नाही. पाण्याचा दीर्घकाळ संचय होईल, अशा उपाययोजना नाहीत. महसूल आणि वनविभागाने हा विषय वेळीच गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. प्रवीण नेवे, वन्यजीव प्रेमी, अडावद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.