आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेची झाडाझडती:रात्रीच्या स्वच्छतेत सातत्य; पण डेली मार्केटमध्येच कचराकुंड्यांचा अभाव

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भुसावळने यंदा ‘टॉप १०’ शहरांच्या क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी १ जानेवारीपासून ‘रात्रीची स्वच्छता’ (नाईट स्विपिंग) सुरु केली आहे. या उपायांची वर्षपूर्ती होत असल्याने ‘दिव्य मराठी’ने सोमवारी (दि.५) रात्री ९ ते १०.३० वाजेदरम्यान शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत पाहणी केली. त्यात ४० स्वच्छता कर्मचारी जामनेर रोड, बाजारपेठ, जळगाव व यावल रोडवर नेमून दिलेल्या ठिकाणी स्वच्छतेची कामे करताना आढळली. मात्र, या पाहणीदरम्यान डेली मार्केटसह ठिकठिकाणी कचराकंुड्यांचा अभावही जाणवला.

‘दिव्य मराठी’ चमूने सोमवारी रात्री ९ वाजेपासून यावल रोडवरील गांधी पुतळा ते श्री गजानन महाराज मंदिर व परत येऊन पुन्हा गांधी पुतळा ते हंबर्डी चौकातून पुढे बाजारपेठ पोलिस ठाणे व पुढे थेट नाहाटा चौफुलीपर्यंत पाहणी केली. यादरम्यान सफाई कर्मचारी गटागटाने अष्टभूजा मंदिर परिसरात रस्ते झाडून कचऱ्याची घंटागाडीतून विल्हेवाट करताना आढळले.

यानंतर १० वाजता नृसिंह मंदिर रोड, सराफा बाजार, मॉडर्न रोड, ब्राह्मण संघ, न्यू एरिया वॉर्ड परिसर गाठला. तेथेही साफसफाईची कामे सुरू होती. तेथून १०.३० वाजता गांधी पुतळ्यापासून जळगाव रोड गाठला. तेथेही पंचमुखी हनुमान मंदिर चौक व पुुढील भागात कर्मचारी साफसफाई करत होते. रात्री ११ वाजेपर्यंत ही कामे चालतात.

उपाययोजनांमध्ये सातत्य राखण्यावर भर
स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ भागात दिवसातून दोनवेळा स्वच्छतेचे निकष आहेत. या निकषांची पूर्तता केली तरच गुणानुक्रम वाढतो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, रात्रीची स्वच्छता या उपाययोजनांमध्ये सातत्य राखण्यावर भर आहे. नितीन लुंगे, समन्वयक, स्वच्छ सर्वेक्षण, भुसावळ पालिका

४० पेक्षा जास्त कामगार | रात्री शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठेत स्वच्छतेसाठी ३० स्वच्छता कर्मचारी, २ सुपरवाझर हवेत. ठेकेदाराने ४० कर्मचारी व चार सुपरवाझर नियुक्त केले आहे. स्वच्छतेनंतर कचरा तातडीने उचलून विल्हेवाट लावणे, प्रमुख रस्ते व बाजारपेठेत रात्री रस्ते झाडून स्वच्छता करणे अशी नियमावली पालिकेने दिली आहे.

९० टक्के कचऱ्याचे संकलन | शहरात यापूर्वी दिवसभरात ६५ टन कचरा संकलित व्हायचा. दोन वेळा सफाईनंतर तो आता ९० टनांपर्यंत पोहोचला आहे. पूर्वीसारखा रस्त्यावर कचरा राहत नाही. पालिकेने बाजारपेठेचे भाग, डेली भाजीपाला मार्केट व प्रमुख रस्त्यांवर कचराकुंड्यांची संख्या वाढवल्यास कचरा रस्त्यावर येऊन अस्वच्छता होणार नाही.

दोनवेळा केली जाते सफाई
प्रमुख रस्ते व बाजारपेठ भागात रात्री ठेकेदार, तर सकाळी पालिका स्वच्छता कामगार, अशी दोनवेळा स्वच्छता केली जाते. देशात सर्वप्रथम मध्य प्रदेशातील इंदूर शहराने हा उपक्रम राबवला. याच पद्धतीने काम करून १ ते ३ लाख लोकसंख्येच्या शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ मध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवण्याचे पालिकेचे प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...